जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
ठाणे : यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने जिल्ह्यातील पाणीस्त्रोताचे बळकटीकरण करण्यासाठी जलयुक्त शिवार टप्पा 2 व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनांची कामे तातडीने सुरू करावीत. तसेच यापूर्वी केलेल्या कामांमधील दुरुस्तीची कामेही सुरू करावीत. ही कामे दर्जेदार होतील, याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी दिले.
जलयुक्त शिवार टप्पा 2, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार आणि प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, कृषि व जलसंधारण अधिकारी यांना जलसंधारणाची कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दूरदृश्यप्रणालीद्वारे तातडीने कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पावसाचे पाणी वाचवून ते जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार आणि प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून पाणी स्त्रोतांचे बळकटीकरण करणे, जलयुक्त शिवार अभियानातील पहिल्या टप्प्यात केलेल्या कामांची आवश्यक तेथे दुरुस्ती करणे, नवीन कामे तातडीने सुरू करणे या कामांना गती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी दिल्या.
जिल्ह्यात वसुंधरा मंडळ संस्थेचे जलसंधारण क्षेत्रात चांगले काम केले आहे. जलयुक्त शिवार अभियानात या संस्थेची तसेच नाम फाऊंडेशन, पाणी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना अशा सेवाभावी संस्थांची मदत घेऊन तातडीने कामे सुरू करावीत. तसेच धरणे, नदी, नाले असे पाण्याचे स्त्रोताच्या ठिकाणी असलेला गाळ काढण्यासाठी येत्या दोन दिवसात अशा ठिकाणांची यादी तयार करावी, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे करावीत. पाणीस्त्रोताच्या ठिकाणचा गाळ काढण्यासाठी इंधनाचा खर्च जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्याचा शासनाचा मानस आहे. तसेच काढलेला गाळ शेतकऱ्याना हवा असल्यास देण्यात यावा. हा गाळ जागेवर त्याच न ठेवता शासकीय जमिनीवर टाकण्यात यावा, असेही जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितले. जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातील झिडके तलाव, कोनगाव, शहापूर व मुरबाड तालुक्यातील टेंभा व कुडवली येथील तलावांमधील गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत 20 हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण 28 कामे घेतली असून 6 कामे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित 22 कामे तातडीने सुरू करण्यात येणार आहेत. पावसाचे पाणी साठविण्यासाठी सिंचन योजनेच्या कामांसह जलयुक्त शिवार व गाळमुक्त धरण योजनांच्या कामांना शासकीय यंत्रणांनी गती द्यावी, असेही श्री. शिनगारे यांनी सांगितले.