महानगरपालिकेच्या मुख्य नाल्यांना अतिक्रमणाचा विळखा

पालिकेला कधी येणार जाग?

ठाणे: घोडबंदर परिसरातील गायमुख व नागला बंदर येथे असलेल्या महापालिकेच्या मुख्य नाल्याच्या प्रवाहात डेब्रिजचा भरणा केल्यामुळे यंदाही घोडबंदरवर पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे अहवालावरून समोर आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी याप्रश्नी तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करून मुख्य नाल्यांवर अतिक्रमण करून प्रवाहात डेब्रिजचा भरणा केल्याचे स्पष्ट झाले असून असा अहवाल पालिकेलाही पाठविण्यात आला आहे. मात्र घोडबंदरची पूरजन्य परिस्थिती टाळण्यासाठी पालिकेला वेळीच जाग येणार का? असा सवाल मनसेचे महिंद्रकर यांनी केला आहे.

घोडबंदर रोडवर सध्या मेट्रो तसेच महानगरपालिका व इतर प्राधीकरणांची विविध कामे सुरू आहेत. जागोजागी रस्ते खोदल्यामुळे काही दिवसांवर आलेल्या पावसाळ्यामुळे येथील परिस्थिती चिंताजनक आहे. पावसाळ्यात घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी नेहमीचीच आहे, पण यंदाची परिस्थिती अधिक बिकट असण्याची शक्यता आहे. घोडबंदर परिसरात गायमुख आणि नागला बंदर येथे महापालिकेचे मुख्य नाले आहेत. या नाल्यांचे आरसीसी बांधकाम न केल्यामुळे ते आजही खुले आहेत. या नाल्यांवर भूमीमाफीयांनी कब्जा केला असून नाल्याच्या प्रवाहात चक्क डेब्रिजचा भरणा करण्यात आला आहे. या अतिक्रमणामुळे आणि टाकलेल्या डेब्रिजमुळे यंदाही घोडबंद मार्गावर पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

या विषयासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी पत्रव्यवहार केला होता. या पत्राच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्या संदर्भात महानगरपालिकेचे नगरअभियंता यांना पत्राद्वारे नाल्याच्या परिस्थितीचा अहवाल दिला आहे.