कोपरीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा

ठाणे : कोपरी भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मंगळवारी सांयकाळी फुटल्यानंतर या जलवाहिनीची तत्काळ दुरुस्ती करून बुधवारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. त्यावेळी नळावाटे घरात दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.

कोपरी येथील धोबीघाट परिसरातील जलकुंभावरून परिसरात पाणी पुरवठा करण्यात येतो. या जलकुंभातून परिसराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी मंगळवारी सायंकाळी फुटली. मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. पालिकेच्या पथकाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. जलकुंभाशेजारीच बांधकाम प्रकल्पाचे काम सुरु आहे. जलकुंभ आणि बांधकाम प्रकल्पाची संरक्षक भिंत एकच आहे. या भिंतीखालूनच परिसराला पाणी पुरवठा करणारी ५०० मी मी व्यासाची जलवाहिनी जाते. दोन महिन्यांपुर्वी बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू असताना, जलवाहिनीला धक्का लागून ती फुटली होती. त्यावेळेसही नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. आताही बांधकाम प्रकल्पाच्या कामामुळेच मंगळवारी सायंकाळी पुन्हा जलवाहिनी फुटल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर, पालिकेकडून मात्र बांधकाम प्रकल्पाच्या कामामुळे जलवाहिनी फुटलेली नसल्याचा दावा केला जात आहे. संरक्षक भिंतजवळील कामामुळे जलवाहिनीवरील माती निघून गेली होती. या जलवाहिनीच्या सांध्याजवळ पाण्याची गळती होत होती. त्याची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. परंतु पाणी पुरवठा सुरू होताच त्याच्या दाबामुळे जलवाहिनी सांध्यातून निखळली, असा दावा महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पालव यांनी केला.

जलवाहिनी फुटल्याने कोपरी परिसराचा पाणी पुरवठा १२ तासाहून अधिक काळ बंद होता. यामुळे कोपरीकरांचे पाण्याविना हाल झाले. जलवाहिनी दुरुस्ती करून पालिकेने कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू केला. पण, परिसरातील काही भागात मात्र दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. घरातील नळांमध्ये येणारे पाणी गढू‌ळ असून त्याला गटाराच्या पाण्यासारखी दुर्गंधी येत आहे. दरम्यान, जलवाहिनी फुटल्यानंतर त्यात माती शिरल्यामुळे काही भागात दुषित पाण्याचा पुरवठा होत असावा, अशी शक्यता पाणी पुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.