मुंबई: पंचवार्षिक नाट्य परिषद निवडणूक मध्यंतरी पार पडली पण अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतिक्षा सगळ्यांनाच होती. आज अध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली असून अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे.
प्रसाद कांबळी यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले यांचं ‘रंगकर्मी समूह’ या दोन गटांमध्ये चांगलीच चुरस रंगली. प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले या दोघांमध्ये कोण लढत जिंकणार याची उत्सुकता ताणली गेली होती.
‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’च्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. प्रशांत दामलेंच्या ‘रंगकर्मी नाटक समूहा’चे कार्यकारिणीवर वर्चस्व पाहायला मिळत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 11 जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संजय देसाई, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा कार्यकारिणीत समावेश आहे.
नाट्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी पत्रकार परिषद घेत अध्यपदाच्या निवडणूकीसंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की,”नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झाली आहे. कार्यवाहपदी अजित भुरे निवडून आले आहेत. तर कोषाध्यक्षपदी सतिश लोटके यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष उपक्रमपदी भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे”.
अध्यक्षपदी प्रशांत दामले यांना 60 पैकी 50 मतं पडली आहेत. त्यामुळे ‘रंगकर्मी नाटक समूहा’मध्ये आनंदाचे वातावरण आहे.