ठाणे: कोपरी पुलावरील भुयारी मार्गामुळे तीन हात नाका येथील वाहतुकीचा ताण कमी होऊन एक सिग्नल कमी होणार आहे तसेच वेळेचीही बचत होणार आहे.
ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी भागात नवीन पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या पुलाखाली भुयारी मार्गाचे काम सुरु आहे. ज्ञानसाधना महाविद्यालय आणि नौपाड्यातील भास्कर काॅलनी पूर्व भागातून वागळेकडे जाणाऱ्या ठाणेकरांना वाहतुकीसाठी या मार्गाचा उपयोग होणार आहे. ठाणे स्थानक आणि वागळे इस्टेट भागातील वाहतुकीसाठी या भुयारी मार्गाचा उपयोग होणार आहे.
सद्यस्थितीत या मार्गावरील वाहतूक तीन हात नाका चौकातून होते. भुयारी मार्ग झाल्यानंतर या चौकातील वाहतूकीचा ताण कमी होण्याची चिन्हे आहेत. या भुयारी मार्गाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे. तर, या मार्गाखालील नाल्याचे काम ठाणे महापालिका करित आहे. या मार्गाला नौपाडा आणि ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील सेवा रस्ते जोडण्यात येणार आहेत. त्यासोबतच भुयारी मार्गाच्या परिसरात सुशोभिकरणाची कामे करण्यात येत आहेत. या सर्व कामांची महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच पाहणी केली. या दौऱ्या दरम्यान त्यांनी भुयारी मार्गाचे काम पूर्ण होत आले असून हा मार्ग लवकरच खुला केला जाणार आहे, असे बांगर यांनी यावेळी स्पष्ट केले. नाल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यावर भराव टाकून रस्ता केला जाणार आहे. हा रस्ता १५ जूनपर्यंत पूर्ण होण्यासाठी उर्वरित कामाचे नियोजन तशा पद्धतीने करावे. बांधकाम अवधी काही प्रमाणात कमी झाला तरी गुणवत्तेत मात्र तडजोड करू नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट. शहरात २८२ रस्त्यांशिवाय, विकास आराखड्यातील रस्त्यांचीही कामे सुरू आहेत. ही कामे करताना भूसंपादन, अतिक्रमणे यांच्या काही अडचणी आहेत. त्याही पावसाळ्यापूर्वी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून मार्ग निघण्यास विलंब होत असेल तर तो रस्ता पावसाळ्यापूर्वी वाहतूक योग्य करून ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी बांधकाम विभागाला दिल्या.