आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपाने ठामपा वर्तुळात खळबळ
ठाणे : ठाणे शहरासह कळवा आणि मुंब्रा भागात रस्त्यांची कामे सुरु असून त्यासाठी शासनाकडून खास निधी आणला आहे, मात्र चांगल्या रस्त्यांवर नवीन डांबर टाकून करोडो रुपयांची बिले काढायची, असे नवीन तंत्रज्ञान ठामपा अधिकाऱ्यांनी आणले आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करीत केला आहे.
रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाने पालिकेला ६०५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून सिमेंट कॉंक्रीट, मास्टीक आणि डांबरीकरणाच्या माध्यमातून रस्ते नुतनीकरण आणि दुरुस्तीची कामे सुरु आहेत. सर्व कामे मे महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे दावे पालिका प्रशासनाकडून केले जात आहेत. असे असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे, कळवा आणि मुंब्रा भागात सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांवरून पालिका प्रशासनावर ट्वीटवरून टीका केली आहे.
कुठले रस्ते चांगले आहेत आणि कुठल्या रस्त्यावर डांबर टाकले आहे, हे मी प्रत्यक्ष दाखवायला तयार आहे, असे श्री.आव्हाड यांनी म्हटले आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे स्थायी समितीला जास्तीत जास्त एक ते दीड टक्का घ्यायचे. आता महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच टक्के इतका रेट वाढवलेला आहे. जोपर्यंत पाच टक्के (मी नावही जाहीर करेन) अधिकाऱ्याच्या हातात पडत नाहीत, तोपर्यंत फाईलवर सहीच होत नाही. बाहेर आल्यावर स्वतःला अतिशय पापभिरू अधिकारी म्हणून मिरवणारे केबिनमध्ये बसल्यावर रावणाचा अवतार धारण करतात आणि भस्मासूरासारखे वागतात. सगळीकडे कामे बंद स्थितीत आहेत. लोक फाईल घ्यायला तयार नाहीत. एक टक्क्यावरच समाधान मानायला हवे होते. आपली तर भूक इतकी मोठी आहे की आपले सगळे अधिकारी पाच टक्के मागायला लागले आहेत. आज ना उद्या नवीन नंदलाल समिती बसवावी लागेल, असे देखील त्यांनी ट्वीटवरून स्पष्ट केले.