२५ वर्षे जुनी अनधिकृत इमारत
ठाणे: भास्कर कॉलनी येथे तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेसह तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. दोन जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर कारवाई केलेल्या आणि पुन्हा दुरुस्त करून उभारण्यात आलेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भास्कर कॉलनी येथील अमर टॉवर ही तळ अधिक सात मजल्याची इमारत आहे. आज सकाळी १०.३०च्या दरम्यान तिसऱ्या मजल्यावरील हॉलमधील स्लॅब कोसळून दुसऱ्या मजल्यावर कोसळला त्यामध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणारे प्रथमेश सूर्यवंशी (२४)श्रीमती विजया सूर्यवंशी (५४) आणि अथर्व सूर्यवंशी (१४) हे तिघे जखमी झाले आहेत. या तिघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या प्रियंका सूर्यवंशी आणि शिशिर पित्रे (६०) या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले आहे.
ही इमारत १९९८ साली ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने भागीदारीत अनधिकृत बांधकाम करून उभी केली होती. त्यावेळी दोन ते तीन वेळा कारवाई करण्यात आली होती. बिल्डरने ती दुरुस्त करून पुन्हा बांधली होती, अशी माहिती समोर आली आहे. या इमारतीत ३२ कुटुंबे राहत होती. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पहिल्या मजल्याचा स्लॅबही धोकादायक झाला आहे, त्यामुळे महापालिका प्रशासनाने ही संपूर्ण इमारत खाली करून त्यांना महापालिका शाळेत तात्पुरते हलविले आहे.
या इमारतीचे दर तीन वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते, परंतु स्लॅब कसा पडला हे समजत नाही, असे इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले. दुर्घटना घडली तेव्हा सूर्यवंशी कुटुंबातील श्रीमती विजया सूर्यवंशी या स्वयंपाक घरात होत्या तर त्यांचे दोन मुलगे आणि एक मुलगी बेडरूममध्ये होती, त्यामुळे ते सुदैवाने बचावले तर पित्रे यांचे तेथे कार्यालय आहे. ते हॉलमध्ये नव्हते. म्हणून तेही बचावले, परंतु स्लॅब पडल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले, असे येथील एका नागरिकाने सांगितले.
अमर टॉवर दुर्घटनेचा धडा; ठामपाने वेळीच जागे व्हावे! (हेडिंग)
आमदार संजय केळकर यांचा सावधगिरीचा इशारा
येथील भास्कर कॉलनीमधील २५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून तीन रहिवासी जखमी झाले आहेत. अनधिकृत इमारतीने ठामपाला शिकविलेला हा धडा असून प्रशासनाने वेळीच जागे व्हावे, अन्यथा येत्या पावसाळ्यात आणखी जीवितहानी होण्याची शक्यता आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली.
भास्कर कॉलनी येथील सात मजली जखमी रहिवाशांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना श्री.केळकर म्हणाले की ही दुर्घटना म्हणजे ठाणे महापालिकेला धडा असून प्रशासनाने वेळीच जागे व्हावे, अन्यथा येत्या पावसाळ्यात अशा दुर्घटनांमधून जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
शहरात सध्या अनधिकृत इमारतींची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून याची माहिती सहाय्यक आयुक्त आणि वॉर्ड अधिकाऱ्यांनाही आहे. मात्र प्रती चौरस फुटाने पैसे घेऊन अशा बांधकामांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला. गेल्या दोन वर्षात किती इमारती झाल्या आणि सध्या सुरू असलेल्या अनधिकृत इमारतींचे पावसाळ्याआधीच सर्वेक्षण करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला.
प्रभागात सर्वसामान्यांनी चार विटा जरी रचल्या तरी अधिकारी त्यांच्या दारात जाऊन उभे राहतात, पण आठ -दहा मजली इमारती अनधिकृतपणे उभ्या राहत असताना त्याकडे दुर्लक्ष करतात. अनधिकृत इमारतींबाबत अधिकाऱ्यांना केवळ नोटीसा बजावण्यात येऊ नयेत तर सहायक आयुक्तांना यात जबाबदार धरून कठोर कारवाई करण्यात यावी, तरच अनधिकृत इमारतींना आळा बसेल, असा सल्लाही श्री.केळकर यांनी दिला.