आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश
ठाणे: झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्या तोडताना आणि जाहिरात होर्डिंग्जसाठी झाडांचा बळी जाता कामा नये, असे निर्देश आज आयुक्त अभिजित बांगर यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात धोकादायक फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या उद्यान विभागाच्या बैठकीत, झाडांच्या फांद्या तोडण्याच्या तक्रारी केल्या तरी त्यावर कारवाई होत नाही, असा प्रतिसाद नागरिकांकडून मिळत असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले. त्यामुळे आताची झाडांची स्थिती लक्षात घेऊन प्रत्येक प्रभाग समितीचे चार ते पाच छोटे विभाग करावेत. एकेका विभागातील झाडांच्या धोकादायक फांद्या तोडल्या जाव्यात. एकेक विभाग पूर्ण झाला की तसा अहवाल सादर करावा. या कामासाठी २५ मेही कालमर्यादा असेल. तोवर शहरातील झाडांच्या सर्व धोकादायक फांद्या तोडल्या गेलेल्या असाव्यात, असे निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी दिले.
झाडांच्या फांद्या तोडताना, ‘ट्री ट्रिमिंग’ म्हणजे ‘ट्री कटींग’ नाही. या दोन्ही गोष्टींमध्ये मुलभूत फरक आहे. हे कायम लक्षात ठेवावे. कोणत्याही परिस्थितीत झाड उद्ध्वस्त होता कामा नये. त्याचवेळी, पावसाळ्यापूर्वी सर्व ठिकाणच्या धोकादायक फांद्या काढण्यात दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.
झाडांच्या धोकादायक फांद्यांबाबत वाहतूक पोलिसांनी केलेल्या सूचनाही उद्यान विभागाने लक्षात घ्याव्या. तसेच, फांद्या तोडताना झाडाचा तोल जाणार नाही, अशा पद्धतीने काम करावे. सुकलेली झाडे, झुकलेली झाडे, धोकादायक फांद्या काढत असताना झाकोळले गेलेल्या पथ दिव्यांचीही सफाई करावी. त्यासाठी आवश्यक तेवढ्याच फांद्या तोडल्या जाव्यात, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले.
जाहिरातीच्या होर्डिंगसाठी एकाही झाडाला हात लावायचा नाही. होर्डिंगच्या मध्ये झाड येत असेल तर होर्डिंगची जागा बदला. होर्डिंगमधून मिळणारा जाहिरातीचा महसूल आणि झाडांचे संरक्षण यात झाडांचे संरक्षण हे पालिकेचे मुलभूत कर्तव्य आहे. याचे भान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ठेवावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
या बैठकीस, अतिरीक्त आयुक्त (२) संजय हरवाडे, उपायुक्त शंकर पाटोळे, उद्यान अधीक्षक केदार पाटील, उद्यान निरीक्षक, तपासनीस आदी उपस्थित होते.