भाईंदर: कोकणी हापूस आंब्याच्या नावाखाली बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात परराज्यांतील हापूसची विक्री केली जात आहे. यात कर्नाटकमधील हापूस आंब्याचा सर्वाधिक समावेश असून घाऊक बाजारात सरासरी १५० रुपये किलोने विकला जाणारा आंबा किरकोळ बाजारात ४०० ते ५०० रुपये डझनाने विकले जात असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे.
कोकणातील अस्सल हापूसला सर्वच फळांचा राजा असा नावलौकिक आहे. त्याची अवीट चव, गोडीमुळे अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी कोकणातील हापूस आंब्याची कलमे नेऊन आंब्याचे उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे आता या हापूस आंब्याच्या कलमांवरील आंबे बाजारात विक्रीसाठी येत आहेत. कर्नाटकातील होली, धारवाड, बंगळूरमधून दरवर्षी हा हापूस मुंबईच्या बाजारात दाखल होत असतो. यंदा कोकणातील आंब्याचे झालेले नुकसान पाहता कर्नाटकी आंबा बागायतदारांनी आपला मोर्चा मुंबईतील बाजारपेठांकडे वळवला आहे. सध्या बाजारात कर्नाटकमधील हापूसच्या ६० हजार पेट्या दररोज दाखल होत आहेत. त्यात अवकाळीचा फटका बसल्याने कोकणातून हापूसच्या अध्यांची फक्त १८ हजार पेट्यांची आवक झाली आहे. त्यामुळे कोकणच्या हापूसचे दर चढेच असल्याने ग्राहकांना कर्नाटकमधून येणारा हापूस विकला जात आहे.
कर्नाटकी हापूस दिसायला जरी कोकणी हापूससारखा असला तरी त्याला कोकणातील हापूसची चव काही आलेली नाही. हा आंबा आतून काहीसा आंबट लागतो. कोकणातील हापूसचा गोडवा त्याला येत नाही. त्यामुळे आंबा खरेदी करणाऱ्याला खाताक्षणी ते लक्षात येते.आंबा कापल्याशिवाय कोकणी हापूस आहे की नाही हे लक्षात येत नाही. अस्सल कोकणी हापूस आंब्याचा रंग आतून केशरी असतो, तर हापूसच्या नावाने विकल्या जाणाऱ्या इतर आंब्यांचा रंग आतून पिवळसर असतो. हाच एक फरक त्यामध्ये आहे.