गरोदर मातांच्या मातृत्वाचा सन्मान
ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात एक लाख ६८,७१३ गरोदर महिलांनी पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्या बँक खात्यात ६२ कोटी ९३ लाख एक हजार रुपये एवढे अनुदान डिबीटीद्वारे जमा झाले आहे.
गरोदर महिलांसह त्यांच्या बाळाच्या पोषणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी या अनुदानाचा उपयोग झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली
माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गरोदर आणि स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुदृढ व्हावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री मातृवंदना योजना 1 जानेवारी 2017 पासून राबविण्यात आली आहे.
मातृत्व वंदना योजना सुरु झाल्यापासून, १ जानेवारी २०१७ ते ३० मार्च २०२३ या कालावधीत ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील एक लाख ६८,७१३ महिलांनी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजेनचा लाभ घेतला आहे. या महिलांना ६२ कोटी ९३ लाख एक हजार रुपये एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यावर डिबीटीद्वारे वितरित करण्यात आली आहे.
शहरी भागातील एक लाख २६ हजार १०९ महिला तर ग्रामीण भागातील ४२,६०४ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
महिला आणि बाल विकास मंत्रालया मार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेमार्फत महिलांना टप्प्या टप्प्याने पाच हजार रूपये दिले जातात. पात्र महिला जननी सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थी असल्यास तिला अतिरिक्त एक हजार रुपये म्हणजेच एकूण सहा हजार रुपये दिले जातात. यासाठी अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन अर्ज करता येतो. ही रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. याचा पहिला हप्ता अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपये, दुसरा हप्ता हा गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर दोन हजार रुपये, तर तिसरा हप्ता हा पाल्याच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दोन हजार रुपये दिला जातो.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत गर्भवती महिलांनी नोंदणी करून आपले व आपल्या बालकाचे आरोग्य सुधारावे. या योजनेमुळे माता मृत्यू आणि बाल मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.