राज ठाकरे आजपासून ठाणे-पालघर दौऱ्यावर

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्यापासून (शुक्रवार) ठाणे आणि पालघर दौऱ्यावर असून आगामी लोकसभा, विधानसभा तसेच विशेष करून पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

या दौऱ्याच्या निमित्ताने ते पक्षाच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यासोबतच पदाधिकाऱ्यांच्या बैठका तसेच सर्वसामान्य नागरिकांशीही ते संवाद साधणार आहेत. ठाणे जिल्ह्यात यापूर्वी मनसेचे मोजके नगरसेवक असल्याने काही प्रमाणात का होईना या ठिकाणी मनसेची ताकद होती. आता राज्यातील सत्तांतरानंतर या जिल्ह्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा हा गड असल्याने या ठिकाणी काँग्रेस,राष्ट्रवादी आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असून आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी ठाकरे गटाकडून देखील विशेष प्रयत्न केले जात आहे. ठाणे जिल्ह्यात प्रमोद पाटील हे मनसेचे एकमेव आमदार असल्याने त्यांच्यावरच पक्षाची मदार आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठीही हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. यापुर्वी जिल्ह्यात झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले आहे. तसेच पक्षाची ताकद वाढविण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून सातत्याने राज ठाकरे यांच्या दौऱ्यांचे आयोजन केले जात आहे. अशाच प्रकारे राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे पुन्हा आयोजन करण्यात आले आहे.

राज ठाकरे यांचा दौरा सुरू होणार आहे. १५ मेपर्यंत हा दौरा असणार आहे. या कालावधीत ते मीरा-भाईंदर, वसई, विरार, नालासोपारा, भिवंडी, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे शहर असा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्यानिमित्ताने मनसे जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत.