ठाणेकरांनी ४० दिवसांत भरला १०० कोटींचा मालमत्ता कर

ठाणे: मालमत्ता कराच्या विक्रमी वसुलीचा ओघ कायम ठेवत ठाणे महापालिकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४० दिवसात १०० कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली केली आहे. विशेष म्हणजे ५१ टक्क्यांहून जास्त ठाणेकरांनी ऑनलाईन मालमत्ता कर भरणा केला आहे.

गेल्या आर्थिक वर्षात ७२२ कोटी रुपयांचा विक्रमी मालमत्ता कर गोळा केल्यानंतर, ठाणे महापालिकेने चालू (२०२३-२४) आर्थिक वर्षाची देयके १ एप्रिलपासून करदात्यांना पाठविण्यास सुरूवात केली. मोबाईलवर पाठविण्यात आलेल्या या संदेशाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागास यावर्षी सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या कर वसुलीचे लक्ष्य आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहे. त्यानुसार, नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत दहापट वाढ

गेल्या वर्षी १० मेपर्यंत ११.४६ कोटी रुपयांचा कर भरणा झाला होता. या वर्षी ही रक्कम १००.८५ कोटींच्या घरात पोहोचली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत दहापट वाढ झाली आहे. तोच कल मालमत्ताधारकांच्या संख्येबाबतही आहे. गेल्या वर्षी या काळापर्यंत ६४१५ मालमत्ताधारकांनी कर भरला होता. ती संख्या यावेळी ७४ हजार ९०८ एवढी आहे.

कर दात्यांपैकी ५१.२५ टक्के नागरिकांनी कर भरणा करण्यासाठी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेतला आहे. तर, ३३ टक्के कर दात्यांनी धनादेशाद्वारे कर भरणा केला आहे. रोख रकमेने कर भरणा करण्याचे प्रमाण आता ८.८० टक्क्यांवर आले आहे.

सर्वाधिक ३६.१९ कोटी रुपयांचा कर भरणा माजिवडे-मानपाडा क्षेत्रात झाला आहे. तर सर्वात कमी २.५४ कोटींचा करभरणा मुंब्रा प्रभागात झाला आहे.

मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. मालमत्ताधारकांना या केंद्रांवर सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता या वेळेमध्ये मालमत्ता कर भरता येईल.

पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता कराच्या सोबत दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रितपणे महापालिकेकडे जमा केल्यास कालावधीनिहाय दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये करदात्यांना सवलत दिली जाते. १५ जूनपर्यंत १० टक्के, ३० जूनपर्यंत ४ टक्के, ३१ जुलैपर्यंत ३ टक्के आणि ३१ ऑगस्टपर्यंत कर भरणा केल्यास २ टक्के सवलत देण्यात येणार आहे.

प्रभाग समिती कर भरणा (कोटी रुपयांमध्ये)

माजीवडा-मानपाडा : ३६.१९
वर्तकनगर : २५.५२
नौपाडा-कोपरी : १०.८५
उथळसर : ८.९६
लोकमान्य-सावरकर नगर : ४.०५
कळवा : ३.२५
दिवा : ३.५६
वागळे इस्टेट : २.७२
मुंब्रा : २.५४
मुख्यालय : २.९९

करभरणा – रक्कम

ऑनलाईन ५१.६९ कोटी
धनादेश ३३.८० कोटी
रोख ८.८७ कोटी
डीडी ६.३७ कोटी
कार्ट पेमेंट ०.१२ कोटी