रोटरी क्लब ऑफ ठाणे इम्पिरियल यांच्यातर्फे पर्यावरणस्नेही अशा बांबूचा वापर करुन एक प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. यावेळी रोटरीचे प्रांतपाल कैलाश जेठानी उपस्थित होते.
ठाणे: ‘शहराच्या विकासात सर्वसामान्य नागरीकांनी सहभागी व्हावे यासाठी ठाणे महापालिका आपले द्वार खुले ठेवील,’ असे विचार ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले.
घोडबंदर रोडवरील चितळसर मानपाडा परिसरात दोस्ती इम्पेरिया गृहसंकुलाच्या प्रवेश द्वाराजवळ रोटरी क्लब ऑफ ठाणे इम्पेरिया यांनी बांबूपासून बनवण्यात आलेल्या प्रवासी निवारा प्रकल्प राबवला. त्याचे उद्घाटन श्री. बांगर आणि रोटरीचे प्रांतपाल कैलाश जेठानी यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ रोटेरियन ‘ठाणेवैभव’ संपादक मिलिन्द बल्लाळ, माजी अध्यक्ष राजेंद्र झेंडे, नितीन बाकरे आदी उपस्थित होते.
श्री. जेठानी यांनी रोटरीतर्फे सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. श्री. बल्लाळ यांनी रोटरीतर्फे अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट ही संकल्पना राबवण्याचा विचार व्यक्त केला. श्री. बांगर यांनी त्याचे स्वागत करुन अभिनव योजना कार्यान्वित करण्यासाठी लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन दिले.
क्लबच्या अध्यक्षा रीत कुमार आणि प्रकल्प प्रमुख परिक्षित लाड यांनी योजनेची माहिती देऊन असे आणखी निवारे बांधण्याचा प्रस्ताव मांडला.