छायाचित्रांसहित पालिका आयुक्तांकडे तक्रार
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळापूर्वीची नाल्यांची तसेच गटारांची सफाई करण्याची कामे सुरु झाली असून ही सफाई करणारे कामगार मात्र सुरक्षा साहित्य विनाच सफाई करत असल्याची बाब उघड झाली आहे.
श्रमिक जनता संघ आणि म्युज फाऊंडेशनने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे छायाचित्रांसहित यासंदर्भात तक्रार केली असून यावर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
शहरातील नालेसफाई कामांच्या पार्श्वभूमीवर श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी महापालिकेकडे लेखी निवदेन दिले होते. त्यामध्ये किमान वर्षभरासाठी प्रत्येक कामगाराचा वैद्यकीय विमा काढावा तसेच कामगारांना सुरक्षा साहित्य पुरवावे अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची बाब खैरालिया यांनीच उघडकीस आणली आहे. ४ मे रोजी ठाणे पूर्व भागात भुयारी गटारामध्ये कामगारांना उतरवून सफाई करण्यात येत आहे. तसेच ठाणे महापालिका मुख्यालयसमोरील गटारातही कामगारांना उतरवून गाळ बाहेर काढण्यात येत आहे. या सर्व कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साहित्ये दिलेली नव्हती.
कामगारांना केवळ रबरी हात मोजे देण्यात आले होते. सुरक्षा गणवेश देण्यात आलेला नव्हता. शिवाय, बंदिस्त गटारामध्ये विषारी वायू असेल किंवा प्राणवायूचे प्रमाण कमी असेल तर कामगारांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून त्यांना प्राणवायूचे मास्क देणे गरजेचे होते. तेही देण्यात आलेले नव्हते, असा दावा खैरालिया यांनी केला आहे. याबाबत श्रमिक जनता संघ आणि म्युज फाऊंडेशनने महापालिका आयुक्त तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली असून त्यासोबत दोन्ही ठिकाणचे छायाचित्र पुरावे म्हणून सादर केले आहेत. याप्रकरणी कंत्राटदार व संबंधित पालिका अधिकारी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.