शासनाच्या तिजोरीत सव्वा तीनशे कोटींचे ‘उत्पादन’

३० कोटींचा अधिक महसूल

ठाणे : ठाणे विभागाच्या उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) नेहमीप्रमाणे, गतवर्षीच्या तुलनेत या वर्षातही ३० कोटींचा अधिक महसूल मिळवून दिला. २०२२-२३ या आर्थिक वर्षात सुमारे ३२५ कोटी ५३ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

ठाणे जिल्ह्यातून उत्पादन शुल्क विभागाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि १५ मार्चपर्यंत १७५ कोटी रुपयांचा महसूल ठाणे जिल्ह्यातून संकलित झाला होता. परंतु अखेरच्या टप्प्यात अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम केले, असे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क ठाणे जिल्हा अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी सांगितले.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्य सरकारला सुमारे २१ हजार ५०० कोटींचा महसूल मिळवून दिला. यामध्ये ठाणे विभागाने आर्थिक वर्षात सुमारे ३२५.५३ कोटी रुपये जमा केले आहेत, असे डॉ. सांगडे म्हणाले.
ठाणे विभागाने गतवर्षांपेक्षा २९५.४७ कोटी रुपयांचा महसूल जमा केला. मात्र या वर्षी उत्पन्न अधिक वाढले आहे. मद्य दुकाने, बार अँड रेस्टॉरंट यांचा परवाना, त्याचे नूतनीकरण, परराज्यांतून येणा-या मद्यावरील शुल्क (आयात शुल्क), परवान्यांचे अन्यत्र जागी स्थलांतर करणे (विशेष अधिकार शुल्क ) अशा विविध मार्गांनी विभागाकडे महसूल जमा झाला.

यावर्षी ३० कोटी ६० लाखांचा अधिक महसूल जमा झाला. येत्या १५ दिवसांत विभागाकडून महसूल वाढविण्यासाठी योग्य आखणी केली आणि सुमारे १५० कोटी शासनाला मिळवून दिले आहेत, अशी माहिती डॉ. सांगडे यांनी दिली.