निवासी नायब तहसिलदाराला लाच घेताना अटक

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सध्या ‘सेतु- ठाणे वर्ग दोन’ मध्ये कार्यरत असलेला तत्कालिन निवासी नायब तहसिलदार वासुदेव पवार (५७) याला एक लाख ४२ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे युनिटने सापळा लावून पकडले.

ही लाच पवारने ठाणे शासकीय विश्रामगृहात स्विकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. यावर्षातील हा पहिलाच मोठा सापळा यशस्वी झाला आहे. तक्रारदार यांच्या परिचयाची व्यक्तीची मौजे नागाव, ठाणे येथे शेतजमीन आहे. सर्व्हे क्र. २२८ या शेतजमिनीचे अकृषिक जमीनीमध्ये रुपांतरीत करुन त्याचे आदेश देण्याकरीता निवासी नायब तहसिलदार पवारने लाचेच्या रकमेची मागणी केली होती.

तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने २९ मार्च २३ रोजी पडताळणी केली असता पवारने तक्रारदाराकडे तब्बल एक लाख ४२ हजार रुपयांची लाच मागितली. युनिटने त्याला त्यांच्या सापळ्यात अडकवले आणि त्याला पकडले.