प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हल्लाबोल
ठाणे : नवीन सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण पाचपटीने वाढले असून त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकारने केले असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाण्यात केला.
सोमवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले ठाण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील टीका केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुथ्वीराज चव्हाण तसेच बाळासाहेब थोरात व इतर मान्यवर उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी मोदी सरकार विरोधात अदानीप्रकरणात आवाज उठवल्यानेच त्यांची खासदारकी रद्द करून त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. शेतकरी भाजपासाठी महत्वाचा भाग राहिला नाही. शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन ते सत्तेत आले. पण भाजपाने शेतकऱ्यांना बरबाद केले, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत त्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस त्यांच्या मागे उभी असल्याचे देखील पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपाला परभवाची भीती निर्माण झाल्याने निवडणुका होत नाहीत. सत्तेत आल्यावर दुसऱ्या दिवशी ओबीसी राजकीय आरक्षण देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मग आता आरक्षण का दिले जात नाही, असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थितीत केला.
निवडणुकांच्या तोंडावर राज्यात जातीयवाद निर्माण करण्याचे काम सुरु आहे. मात्र लोकांनी संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ईव्हीएम मशीनबाबत त्यांना प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की त्याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. त्यावर न्यायालय त्यांचा योग्य तो निर्णय देईलच. पण आता निवडणुका ईव्हीएम मशीनने होवो की बॅलेट पेपरवर, कोणत्याही परिस्थितीत भाजपाची सत्ता ही जाणारच असेही शेवटी नाना पटोले म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले आम्ही आजही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत. यावर न्यायालयात राज्य सरकारच्या वकीलाने व्यवस्थित युक्तिवाद केला तर ही समस्या सुटेल. त्याकरिता मुख्यमंत्र्यांनी वकिलांशी चर्चा करावी, असे चव्हाण यांनी सांगितले. सत्तेचे जॅकेट घालणाऱ्यांना ते घालू द्या, त्या जॅकेटचा परिणाम आगामी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणूकीवर होणार नाही. गाजावाजा करत जे अयोध्याला जात आहेत. म्हणजे ते पाकिस्तानवर वार करण्यास जात नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करत रामराज्याचा अर्थ म्हणजे सुखी राज्य. पण येथे हे दुःखी राज्य असल्याची खंत त्यांनी यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केली.
ठाण्यात ही काँग्रेसचे आमदार – खासदार दिसतील
ठाणे जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्या पूर्वीप्रमाणे काँग्रेस पुन्हा ताकदीने उभी राहील. त्यादृष्टीने कामाला लागा असे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे आमदार आणि खासदार दिसतील, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.