मुंबई: आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील ७६.१६ दशलक्ष टन लोडिंगच्या तुलनेत ७.५% वाढीसह २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेची ८१.८८ दशलक्ष टन मालाची झालेली लोडिंग, मध्य रेल्वेवरील आतापर्यंतची सर्वोत्तम लोडिंग आहे.
मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये केवळ लोडिंगचे उद्दिष्टच साध्य केले नाही तर ते २.४% ने ओलांडले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ पेक्षा ५.७२ दशलक्ष टन वाढीव लोडिंग नोंदवले गेले आहे. मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ८४३८.८३ कोटींचा मूळ महसूल नोंदवला, जो आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत १५.१ % वाढला आहे. तसेच गेल्या आर्थिक वर्षापेक्षा ११०८.६ कोटींची वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील ५२४ रेकच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ९४.७% ची विक्रमी वाढ नोंदवून ऑटोमोबाईल्सचे १०२० रेक लोड करण्यात आले. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मध्य रेल्वेच्या एकूण लोडिंग आकडेवारीमध्ये लोह खनिजाच्या लोडिंगमध्ये १.६९ दशलक्ष टन वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये लोह आणि स्टीलमध्ये ५४.१%, कांद्यामध्ये ३२.५%, पेट्रोलियम उत्पादनांमध्ये २१.१%, कंटेनरमध्ये १६.४%, अन्नधान्यांमध्ये ५.७% खतामध्ये ५% आणि सिमेंटमध्ये ४% ने लोडिंगमध्ये वाढ झाली आहे. मध्य रेल्वेने मार्च-२०२२ मधील ७.६२ दशलक्ष टनांच्या तुलनेत मार्च-२०२३ महिन्यात ८.७० दशलक्ष टन इतके मासिक लोडिंग देखील नोंदवले आहे.