व्हॉट्सॲपद्वारे होणार ठाणेकर नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

ठाणे : ठाणे महापालिकेवर प्रशासकीय राजवट लागून वर्ष लोटले आहे. नगरसेवकच नसल्याने नागरीकांच्या तक्रारीचे निवारण तत्काळ व्हावे, मुलभूत सेवासुविधा वेळेवर मिळाव्यात. यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने व्हॉट्सॲप नंबर कार्यन्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे महापालिकेवर ५ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरु असून मागील वर्षभरात नगरसेवकांच्या स्थानिक विकासनिधीतून होणाऱ्या कामांना खीळ बसली आहे. नागरिकांशी संबंधित पाणी, कचरा, आरोग्य, रस्ते अशा मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवावे लागतात, अधिकारी जागेवर हजर नसतात. क्षेत्रीय कार्यालये, मुख्यालयात अधिकारी, कर्मचारी दिसत नाहीत. नागरिकांना सातत्याने हेलपाटे मारावे लागतात. नगरसेवकही माजी बनल्याने अधिकारीही जुमानत नाहीत. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे प्रशासनावर अंकुश नसल्याने मनमानी सुरु असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरीकांची हीच अडचण ओळखून तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, लवकरच एक व्हॉटसअॅप नंबर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मोबाईल क्रमांकावर तक्रार आल्यानंतर तत्काळ संबंधित विभागाकडे पाठवून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले जाणार आहे.