ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटातील एका महिला पदाधिकाऱ्यास या प्रकरणी सोमवारी मारहाण करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय यांनी ठाण्यात येऊन संबंधित महिलेची भेट घेतली.
ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांनी फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने संतापलेल्या शिंदे गटाच्या १५ ते २० महिला कार्यकर्त्यांनी कासारवडवली येथील त्यांच्या कार्यालयाजवळ जाब विचारतांना त्यांना मारहाण केली असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे. सध्या या महिलेला ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी रात्री घडलेल्या या प्रकरणावरून ठाण्यातील राजकारण मात्र चांगलेच तापले. या प्रकरणावरून ठाकरे गटात आणि शिवसेनेत दिवसभर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु होते. यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रमात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी स्वतः ठाण्यात येऊन या महिलेची विचारपूस केली. ठाकरे यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. दरम्यान महिलेला मारहाण झालीच नसल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
एका महिलेला मारहाण केली जाते आणि राज्याचे गृहमंत्री काही करत नसतील आणि केवळ लाळघोटेपणा करत असतील तर या फडतूस गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी थेट टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे, असा प्रतिहल्ला ठाकरे यांच्यावर केला. ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख गुंडमंत्री असाही केला.
मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर यासंदर्भात ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटायला गेल्यानंतर आयुक्त जयजित सिंग जागेवर नसल्याने ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांच्याही निलंबनाची मागणी केली आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानायला हवेत. यापूर्वी ठाकरे केवळ आपल्या कुटुंबापुरते बघत होते. आज हे दोघे काम करत आहेत म्हणून तुम्ही बाहेर पडलात असा टोला ठाकरे यांना लगावला. उद्धव ठाकरे जाहीर सभेत स्वतःला मर्द म्हणून सांगतात तर मग त्यांना आणि खासदार राजन विचारे यांना माझे आव्हान आहे कि एखाद्या स्त्रीला पुढे करून संघर्ष करण्यापेक्षा स्वतः रस्त्यावर या असा टोला देखील म्हस्के यांनी लगावला. सीसीटीव्ही बघितल्यानंतर मारहाण झाली कि बाचाबाची झाली हे स्पष्ट होईल, माफी मागतानाही त्या महिलेची भाषा वेगळी होती. मारहाणीचा बनाव आहे , मारहाण झाली असती तर एक्सरे रिपोर्टमध्ये आले असते. त्यांनी ज्या रुग्णालयात महिलेला दाखल केले आहे तेथील डॉक्टरांनी दिलेल्या अहवालामध्ये मारहाण झाली नसल्याचे उघड झाले असल्याने त्यांचा हा बनाव फसला आहे, त्याचे नैराश्य उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे, असेही म्हस्के म्हणाले.
काय होती पोस्ट?
रोशनी शिंदे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर नरेंद्र मोदी म्हणजे एप्रिल फुल, तर पदवी मिळवण्यासाठी गद्दारी करावी लागते का ? अशा पोस्ट केल्याने शिवसेनेचे पदाधिकारी संतापले.
महिला गरोदर नसल्याचा डॉक्टरांचा निर्वाळा
ज्या महिलेला मारहाण झालेली आहे ती महिला गरोदर असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र ही महिला गरोदर नसल्याचे चाचणीमधून स्पष्ट झाले आहे. तसेच ज्या रुग्णालयात या महिलेला दाखल करण्यात आले आहे त्याच रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मारहाण झाल्याचे तपासणीवरून दिसत नसल्याचे डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.
बुधवारी महाविकास आघाडीकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस ठाण्याला टाळे ठोकण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. या मोर्चाचे नेतृत्व स्वतः आदित्य ठाकरे करणार असल्याचे ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात आले आहे.