अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेच्या घरपट्टी खात्याने यंदा मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत 43.60 कोटी रुपयांची घरपट्टी वसूल केली आहे, मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी दहा टक्के जादा वसुली करण्यात आली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या घरपट्टी विभागाने कर वसुली केल्याने नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये तब्बल ४३.६० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. यंदा सरासरी ९४.४३ टक्के इतकी वसुली झाली आहे. मागील वर्षी ९१ टक्के वसुली झाली होती.
घरपट्टी करामध्ये अंबरनाथ नगरपालिकेला येथील एमआयडीसी भागातून ३० कोटीपेक्षा जास्त रक्कम वसूल होते. तर उर्वरित 13 कोटी रुपये इतर निवासी आणि वाणिज्य मालमत्तेतून वसूल केले जातात. त्यामुळेच अंबरनाथ नगरपालिकेची संपुर्ण मदार घरपट्टी विभागावर आहे. या कर वसुलीसाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली घरपट्टी विभागाचे अधिकारी नरेंद्र संख्ये, प्रशांत राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी वसुलीसाठी मेहनत घेतली.
अंबरनाथ शहरातील सदनिका आणि वाणिज्य अशा एकूण एक लाखापेक्षा जास्त मालमत्तांची नोंद कर विभागात आहे. या मालमत्तांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या तिजोरीत वर्षाला जवळपास ४० ते ४५ कोटी रूपयांपर्यंत करातून उत्पन्न मिळते. तर कराच्या एकूण उत्पन्नापैकी साधारण ३० कोटी रूपयांपर्यंत उत्पन्न हे केवळ एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांच्या माध्यमातून नगरपालिकेला उपलब्ध होते.