सोन्याची बनावट बिस्किटे विकणारे दोघे अटकेत

ठाणे : कमी दरात सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष दाखवून इच्छुक ग्राहकांना बनावट सोन्याची बिस्किटे विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
फेसबुकच्या माध्यमातून कमी सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष देण्यात येत होते.

गुजरातमधील व्यक्ती या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे, अशी ‘टीप’ मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने फसवणुकीच्या गुन्ह्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. ‘सवलतीच्या दरात सोन्याच्या बिस्किटांची विक्री केली जाईल अशी जाहिरात फेसबुकवर देण्यात आली आणि बनावट सोन्याची बिस्किटे देऊन आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
23 मार्च रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक निरीक्षक विकास सूर्यवंशी, संदीप चव्हाण यांनी तांत्रिक तपास केला. त्यांनी मुख्य आरोपी मुस्ताक अब्दुल गणी लोहार उर्फ अविनाश सोनी आणि त्याचा सहकारी फिरोज रजाक शेख उर्फ सनी याला अटक केली आहे. मुस्ताक पान टपरी चालवतो आणि फिरोज मुंबईतील गोरेगावमध्ये राहतो. नवी मुंबई, कोल्हापूर, वाराणसी, जयपुर आदी ठिकाणी मुस्ताकने फसवणुकीचे प्रकार केल्याचे चौकशीत उघडकीस आले.