तिन्ही पुलांच्या दुरुस्तीमध्ये पर्यायी मार्गाचे नियोजन करा – जिल्हाधिकारी

ठाणे: मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम येत्या एक एप्रिलपासून सुरू होणार आहे. तसेच साकेत आणि खारीगाव खाडीपुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. या काळात ठाणे शहर व परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी संबंधित पोलीस यंत्रणांनी सुयोग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.

मुंब्रा कौसा बाह्यवळण (बायपास) रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूलावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी अल्ट्रा हाय परफॉर्मन्स तंत्राने काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच साकेत उड्डाणपूल व खारेगाव खाडीपुलावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या मार्गांवरील दुरुस्ती काळातील वाहतूक नियोजनसंदर्भात आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सुमारे अडीच तास आढावा घेऊन सूचना केल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, ठाणे शहर पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, ग्रामीण पोलीसांच्या अपर पोलीस अधीक्षक दीपाली धाटे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त (वाहतूक) तिरुपती कानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विलास कांबळे यांच्यासह सिडको, एमएमआरडीए, ठाणे, नवी मुंबई महानगरपालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ, जवाहलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, राष्ट्रीय महामार्ग विभाग आदींचे अधिकारी, विविध वाहतूक संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ठाणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 मार्च रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली होती. यावेळी संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी, महानगर प्रदेशातील विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. याबैठकीत मुंब्रा बाह्यवळण मार्ग, तसेच साकेत व खारेगाव खाडी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती गरजेचे असून ती तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले होते. राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम, वाहतुक पोलिस, महापालिका बांधकाम विभाग या विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून ही कामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यावेळी दिल्या होत्या. या कामांसंदर्भात समन्वयासाठी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांना नोडल अधिकारी म्हणून काम पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते.

त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी संबंधित यंत्रणांसोबत दुरुस्ती करण्यात येणाऱ्या रस्त्यांची तसेच या कामामुळे वळविण्यात येणाऱ्या पर्यायी वाहतूक मार्गांची पाहणी केली. त्यानंतर दुरुस्तीचे काम, पर्यायी मार्गांसंदर्भात जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन यंत्रणांना सूचना दिल्या.

साकेत उड्डाणपूल व खारेगाव खाडीपुलाचे काम 10 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या दोनही मार्गावरील दुरुस्ती काळात वाहतूक नियोजनासाठी लागणारे मनुष्यबळ, साहित्य सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे देण्यात येणार आहे. जेएनपीटीकडून गुजरात, नाशिकच्या दिशेने व गुजरात, नाशिककडून जेएनपीटीकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. गर्दीच्या वेळेस ही वाहने काही काळ थांबवून ठेवण्यासाठी पर्यायी मार्गावर ठाणे शहराच्या आजूबाजूच्या परिसरात संबंधित यंत्रणांनी जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून गर्दीच्या काळात ही वाहने रस्त्यावर येणार नाहीत. तसेच पार्किंगच्या जागांच्या ठिकाणी सुविधाही निर्माण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींनी आपल्या संघटनेमार्फत वाहतुकीतील बदल, पर्यायी मार्गाची माहिती संबंधित वाहनचालक, क्लिनरपर्यंत पोहचवावी. तसेच बंद करण्यात आलेले मार्ग, पर्यायी मार्ग यांची माहिती गुगल मॅपवर दर्शविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. तसेच अवजड वाहनचालकांना मार्गाची माहिती व्हॉटसअप, व्हिडिओद्वारे देण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी सांगितले.