मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेश बंदी

ठाणे : ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुंब्रा परिसरातील वनविभागाच्या जमिनीवरील दर्गा आणि मजारवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रवेश करण्यास अविनाश जाधव यांना बंदी घालण्यात आली आहे.

अविनाश जाधव यांच्या या कृतीमुळे मुंब्रा भागातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे, त्यामुळे अविनाश जाधव यांना मुंब्रा प्रवेशबंदीचे आदेश ठाणे पोलिसांनी जारी केले आहेत.

ठाण्यातील मुंब्रा देवी डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि मजारी त्वरित हटवण्यात याव्यात यासाठी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन 15 दिवसात जर कारवाई नाही केली तर याच जागेवर मंदिर बांधू असा इशारा दिला होता. जाधव यांच्या इशाऱ्यानंतर त्याचे पडसाद मुंब्रा भागात उमटले. मुंब्रा परिसरात रमजानच्या महिन्यांमध्ये मनसेच्या या भूमिकेमुळे वातावरण तणावपूर्ण झाले. मागील दोन दिवसांपासून मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आसपास जमाव मोठ्या प्रमाणात जमत होता. त्यातच सध्या रमजानचा महिना सुरु असल्याने शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी खबरदारी घेत मनसे नेते अविनाश जाधव यांना 144 कलमाची नोटीस जारी करीत मुंब्रात प्रवेश बंदी केली आहे.