भाईंदर : मीरा-भाईंदर शहराच्या बिघडलेल्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र शासनाच्या 15व्या वित्त आयोगातील निधीमधून व राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत अंतर्गत दोन डस्ट कंट्रोल यंत्रणा घेण्यात आल्या आहेत. या यंत्रणांचे प्रात्यक्षिक सादरीकरण महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त संजय शिंदे, उपायुक्त रवी पवार, उपायुक्त कल्पिता पिंपळे, माजी नगरसेवक, महापालिका विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मीरा-भाईंदर शहरात सुरू असलेले विविध विकास प्रकल्प आणि औद्योगिक प्रकल्पांमुळे शहरातील हवेवर नकारात्मक परिणाम होत आहे. आयुक्त ढोले यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत दोन डस्ट कंट्रोल यंत्रणा घेण्यात आल्या आहेत. या यंत्रणेद्वारे शहरात धुळीचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी सातत्याने पाण्याचा फवारा मारून धूलिकण कमी करण्यात मदत होणार आहे. त्याचबरोबर शहरातील रस्ते धुवून काढणे, दुभाजके धुवून काढणे, दुभाजकांवरील झाडांना पाणी देणे तसेच त्यावर जमा झालेले धूलिकण, फुटपाथवरील झाडांवर जमा झालेले धूलिकण कमी करणे, उंच झाडांना स्वच्छ ठेवण्यासाठी आणि आग विझवण्याकरिता या यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या यंत्रणेच्या कार्यप्रणालीबाबत करण्यात आलेले सादरीकरण पाहून आयुक्त दिलीप ढोले यांनी समाधान व्यक्त केले.