२८ कंटेनरसाठी साडेपाच कोटी
ठाणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे शहरातील दाटीवाटीच्या ठिकाणी कंटेनर शौचालये उभारण्याचा महत्वाचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. २८ बैठ्या कंटेनर शौचालयात १७० सीट्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी साडेपाच कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून झोपडपट्ट्यांमधे वैयक्तीक शौचालये बांधण्याबाबत अडचणी निर्माण झाल्याने घरातच शौचालये बांधण्यात आली. त्या सर्वांच्या मलवाहिन्या एकत्र जोडण्यात आल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. काही ठिकाणी मलवाहिन्या उखडल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याचे आरोप झाले. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शहरातही वैयक्तीक स्वच्छतागृहे बांधण्यासाठी अनुदान दिले जात होते. यात केंद्र सरकार आठ हजार रुपये, राज्य सरकार चार हजार रुपये आणि ठाणे महापालिकेकडून दोन हजार रुपये असे १४ हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. या अंतर्गत ठाणे शहरात १२,६८६ शौचालये बांधण्याचे प्रस्तावित होते. त्यासाठी आवश्यक दोन कोटी ६९ लाख रूपये महापालिकेला प्राप्तही झाले होते. याच खर्चातून झोपड्यात दाटीवाटीने शौचालये बांधण्यात आली आणि त्याच्या मलवाहिन्या गटारात बंदिस्त करण्यात आल्या. काही ठिकाणी चेंबरही बांधण्यात आले, मात्र महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जे काम करण्यात आले होते ते काही महिन्यातच उखडले आणि चेंबरही भरून वाहू लागले त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.
शहरातील अनेक भागात पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने स्वच्छतागृहे उभारण्यात अडचणी निर्माण होतात त्यावर उपाय म्हणून कंटेनर शौचालय उभारण्याची योजना महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी जाहीर केली आहे.
पालिकेच्या आठ प्रभाग समित्यांतर्गत २८ कंटेनरमध्ये १७० सीटची व्यवस्था करण्यात येणार असून या शौचालयांचा वापर झोपडपट्टी क्षेत्र, वर्दळीची ठिकाणे, पर्यटन स्थळ आदी ठिकाणी करण्याचे प्रस्तावित असल्याचे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.