बेकायदा बांधकामांना दंड आकारून करणार ‘कल्याण’

कडोंमपाचा करवाढ नसलेला २०२६ कोटींचा अर्थसंकल्प

कल्याण : अनधिकृत बांधकामे आणि बोगस परवानग्या यामुळे सर्वसामान्य रहिवाशांचे धाबे दणाणले असताना २०२३-२४च्या अर्थसंकल्पात दंड आकारून अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून मिळणारा महसूल कोट्यवधींच्या घरात जाणार आहे. २०२६ कोटींच्या या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ प्रस्तावित नसल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

कोणतीही करदर वाढ नसलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रक्कम रु. २२०६.३० कोटी जमा व रक्कम रु. २२०५.२० कोटी खर्चाचे आणि रक्कम रु. ११०.५९ लक्ष शिल्लकेचे महापालिकेचे सन २०२३-२४ च्या अंदाजपत्रकाचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी सादरीकरण करुन मंजूरी दिली. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घेतला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी चालू आर्थिक वर्षासाठी कोणताही करवाढ नसणारे २०२६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये नेहमीच्या आर्थिक तरतुदींसोबतच महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य आणि पायाभूत सुविधा वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.

या अर्थसंकल्पात नविन आरोग्य सुविधा, शहर स्वच्छता, घनकचरा प्रकल्प, प्राथमिक शिक्षण, क्रिडा यासह भटके आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्य सुविधांची तरतूद, पार्किंग पॉलिसी, रस्ते विकास, स्मशानभूमी, ऊर्जाक्षम पथदिवे, कचऱ्यापासून खत निर्मिती, स्मार्ट गव्हर्नन्ससाठी आदी महत्वाच्या मुद्द्यांसाठी आवश्यक तरतूद करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी स्पष्ट केले.

केडीएमसी प्रशासनाने यंदाच्या बजेटमध्ये मोफत अंत्यविधीची सुविधा पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांसाठी करण्यात आल्याचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले. तर यासोबतच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अत्यंत कळीचा मुद्दा असलेल्या अनधिकृत बांधकामांसाठीही महापालिका प्रशासन विशेष मोहीम राबविणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या मोहिमेंतर्गत शासन निर्णयाच्या चौकटीत बसणाऱ्या अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी दिली.

केडीएमसीच्या अर्थसंकल्पात मे 2023 पर्यंत केडीएमसी क्षेत्रात शंभर टक्के ऊर्जा क्षम पथदिवे बसवणे. अधिकाधिक रस्ते आणि परिसरांचे सौंदर्यीकरण करणे. प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी विद्युत वाहिनी किंवा गॅस दाहिनी उभारणे. केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी विनाशुल्क अंत्यविधीची सुविधा उपलब्ध करणे. कंटेनर टॉयलेट सुविधा उपलब्ध करणे. पालिका क्षेत्रातील विविध तलावांचे पुनरुज्जीवन करणे. अमृत योजनेअंतर्गत 27 गावांमध्ये पावणेतीनशे किलोमीटरच्या जलवाहिन्यांचे जाळे विणणे. कल्याण डोंबिवली 15 नवीन जलकुंभ उभारणे. डोंबिवली शहरात चाळीस वर्षे जुन्या झालेल्या मल वाहिन्या बदलून टाकणे आदी तरतुदी करण्यात आल्या आहेत.

पायाभूत सुविधांना प्राधान्य देणाऱ्या या अंदाजपत्रकात मालमत्ता करापोटी रु. ४२५ कोटी जमा अपेक्षित धरण्यात आली असून पाणी पट्टीपोटी रु. ८०.४० कोटी जमा अपेक्षित धरण्यात आली आहे. या अंदाजपत्रकात आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला असून, बाई रुक्मिणीबाई रुग्णालय व शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथे प्रत्येकी १० बेडचा क्षमतेचा अतिदक्षता विभाग बाह्ययंत्रणेमार्फत सुरु करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात नागरीकांसाठी एकूण २६ नागरीक केंद्रे कार्यान्वीत करण्यात आली आहेत. बाई रुक्मिणीबाई रुग्णालय व शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथे प्रत्येकी १० बेडचे एन.आय.सी.यु. आणि पी.आय.सी.यु. कार्यान्वीत करण्यात येत आहेत. कल्याण येथे १५० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल पी.पी.पी. तत्वावर उभे करणेकामी मौजे कचोरे येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याचे कामास लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.

बी.एस.यु.पी. प्रकल्पाअंतर्गत ३१३६ सदनिका पुर्ण झाल्या असून त्यातील १००० सदनिकांचे पात्र प्रकल्प ग्रस्तांना वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत ४१३६ सदनिकांचे काम अंतिम टप्प्यात असून ते डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्याचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील ३३ उद्याने व बगीचे यामध्ये जेष्ठ नागरीक व लहान मुलांसाठी ई-टॉयलेट, कन्टेनर टॉयलेट सुविधा करुन देण्याचे प्रस्तावित असून त्यामध्ये महिला/पुरुष/दिव्यांग यांचेकरीता स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. २७ गावांतील पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी एकूण २८ उंच जलकुंभ, २ भूस्तर टाक्या १० संप व पंप गृह व सुमारे २६५ किलोमीटर वितरण वाहिनीचे जाळे उभारुन पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यात येणार आहे. ज्यायोगे सदर गावांमधील नागरीकांना योग्य व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.

पाणी पुरवठा अमृत अभियान २.० अंतर्गत टिटवाळा/कल्याण पूर्व व पश्चिम तसेच डोंबिवली पूर्व व पश्चिम मिळून १५ नवीन जलकुंभ बांधणे, टिटवाळा, उंबर्डे, सापर्डे, खंबाळपाडा येथे नवीन जलकुंभ बांधणे, मोहीली गाव येथे २७५ द.ल.ली. क्षमतेचे उदंचन केंद्र बांधून कार्यान्वित करणे व गौरीपाडा येथे ९५ द.ल.ली. क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र बांधून कार्यान्वित करणेंत येणार आहे. या चारही कामांमुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरेसे, स्वच्छ व शुध्द पाणी समप्रमाणात पुरवठा करणे शक्य होणार आहे.