ठाणे : वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या ठाणेकरांना पुढील काळात त्यातून दिलासा मिळणार असून एमएमआरडीएच्या सहकार्याने बाहेरच्या शहरात जाणारी वाहतूक परस्पर वळविण्यासाठी रस्ते-पुलांचे जाळे उभे केले जाणार आहे.
ठाणे शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून पुणे, नाशिक सुरत आणि मुंबईकडे दरदिवशी हजारो वाहने ये-जा करतात. हे रस्ते प्रशस्त नसल्याने ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने त्याचा सर्वात जास्त फटका ठाणेकरांना बसतो, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी एमएमआरडीएच्या मदतीने घोडबंदरवासिंना वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी १३ किलोमीटर लांबीचा आणि ४५ मिटर रुंदीचा कोस्टल रोड करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी १३,३१६ कोटी १८ लाख इतक्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. हा रस्ता गायमुख येथे सुरू होऊन खाडी किनाऱ्याने खारीगाव टोलनाका येथे संपणार आहे. तसेच तीन हात नाका येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर ग्रेड सेपरेटरचा उतारा काढण्यात आला आहे. त्याचेही काम एमएमआरडीए करणार आहे. इस्टर्न फ्री वे घाटकोपर येथे संपतो, तेथून पुढे नाशिक आणि पुणे येथे जाणारी वाहने ठाणे शहरातील महामार्गावरून जातात. त्यामुळे तीनहात नाका येथे वाहतूक कोंडी होते. ती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फ्री वे चा विस्तार आनंदनगर टोल नाका कन्हैया नगर साकेत असा १४ किलोमीटर लांबीचा कोस्टल फ्री वे करण्यात येणार आहे. त्यासाठी २९०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
आनंदनगर ते साकेत असा १२७५ कोटींची ६.३ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल तयार करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले, त्यामुळे इतर शहराची वाहतूक परस्पर निघून जाणार आहे. ठाणे पूर्वच्या नागरिकांना वागळे येथे जाण्यासाठी तिनहात नाका येथून जावे लागते, परंतु ज्ञानसाधना महाविद्यालयात येथे कोपरी पुलावर सब वे तयार करण्यात आला आहे. तो मे महिन्यात सुरू होणार आहे, त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन त्यांचा वेळही वाचणार असल्याचे आयुक्त श्री. बांगर म्हणाले.
शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जात आहे. मे महिन्यापर्यंत ती सर्व कामे पूर्ण केली जातील, त्यामुळे ठाणेकरांना यावर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचा सामना करावा लागणार नाही, असा दावा आयुक्त श्री. बांगर यांनी केला आहे.
उत्तम दर्जाचे काम न करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे तसेच खड्डा पडला तर ठेकेदाराला प्रति खड्डा एक लाख रुपये दंड ठोठावला जाणार असल्याचे श्री. बांगर म्हणाले