संतप्त नागरिकांचा विभाग कार्यालयात ठिय्या
नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली विभागात मागील सात-आठ दिवसांपासून पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन दखल घेत नसल्याने मंगळवारी येथील रहिवाशांनी विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करत बेजबाबदार अभियंत्यांना हटवण्याची मागणी केली.
स्वतःच्या मालकीचे धरण असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेची राज्यात ओळख आहे. त्यामुळे शहरवासीयांना २४ तास पाणी पुरवठा होत असल्याचा डंका महापालिका नेहमीच पिटत असते, मात्र धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था सध्या घणसोलीकरांची झाली आहे. मागील सात-आठ दिवसांपासून पाणी सुरळीत येत नसल्याने घणसोली विभागातील अनंत नगर, शंकरबुवा वाडी, म्हात्रे आळी, टेतर आळी परिसरात टॅंकर आणि सीलबंद बाटल्यांतील पाण्याचा आधार घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाणी पुरवठ्यातील अनियमितपणामुळे ज्या ठिकाणी दोन ते तीन वेळा पाणी येत होते. तिथे आता दिवसातून एकदाच पाणी येत असल्याने महिला वर्गाला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत मनपाकडे वारंवार तक्रारी करून देखील मनपा अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने मंगळवारी येथील संतप्त रहिवाशांनी विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करत बेजबाबदार अभियंत्यांना हटवण्याची मागणी केली. येत्या दोन दिवसात या भागात सुरळीत पाणी पुरवठा न केल्यास हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मनसेचे विभाग प्रमुख नितीन नाईक यांनी यावेळी दिला.