ठामपा सुरू करणार सीबीएसई बोर्डाची शाळा

ठामपा सुरू करणार सीबीएसई बोर्डाची शाळा

ठाणे : शहरातील गरीब नागरिकांच्या मुलांसाठी ठाणे महापालिका इंग्रजी माध्यमाच्या शाळेनंतर आता सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करणार असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी जाहीर केले आहे.

ठाणे महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या १२९, इंग्रजी माध्यमाच्या सात, उर्दू आणि हिंदी माध्यमातून सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. झोपडपट्टी भागात राहणाऱ्या आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या मुलांनी स्पर्धेच्या युगात टिकून राहावे यासाठी इंग्रजी माध्यमातून मुलांनी शिक्षण घ्यावे याकडे पालकांचा ओढा असतो, परंतु त्यांना ते परवडत नसल्याने महापालिका प्रशासनाने इंग्रजी माध्यमाच्या सात शाळा सुरू केल्या. त्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आता राष्ट्रीय स्तरावरील सीबीएसई बोर्डाच्या माध्यमातून फक्त खासगी शाळांमध्ये शिक्षण मिळत आहे. ते शिक्षण देखील महाग असल्याने ते गरीब आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या पालकांना परवडत नसल्याने महापालिका प्रशासनाने यावर्षी एक सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो त्यानुसार पुढील शाळा काढण्याबाबत विचार केला जाईल, असे आयुक्त श्री. बांगर म्हणाले.

महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या सात शाळांची संख्या वाढविण्यात येणार असून मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतील पट घसरत चालला आहे. तो वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. प्रत्येक वर्ग खोली स्मार्ट क्लासरूम (डिजिटल) केली जाणार आहे. त्याचबरोबर शाळेची रंगरंगोटी, दुरुस्ती आणि मजबुतीकरण केले जाणार आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके आणि गणवेश दिला जाणार असून शिक्षण विभागासाठी ३२ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त श्री.बांगर यांनी दिली.