कल्याण : कोणत्याही देशाची संस्कृती, परंपरा आणि त्याच्या आधारावर उभी असलेली नवता हीच देशाला वेगळेपणा देते. म्हणूनच यावर्षी गणेश मंदिर विश्वस्त मंडळ तथा संयोजन समिती यांनी एका आगळ्या वेगळ्या सांस्कृतिक पथाचे आयोजन केले आहे.
पारंपारिकता आणि नवता यांचा संगम असणारा सांस्कृतिक पथ हा या वर्षीच्या डोंबिवलीतील पंचविसाव्या शोभा यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांच्या आकर्षणाचा विषय आहे. रविवारी १९ मार्च सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत डोंबिवली पूर्व येथील आप्पा दातार चौकापासून मदन ठाकरे चौकापर्यंत रंगमंचीय सर्वसमावेशक सादरीकरण व काही विशेष पारंपारिक सेल्फी पॉईंट्स अशी या कार्यक्रमाची रचना आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वासुदेव, संबळी, गोंधळी, पंचमहाभूतांची दिंडीचे आयोजन केले असून त्यानंतर आप्पा दातार चौकातील रंगमंचावर योग प्रात्यक्षिक, सहा लोकनृत्य, मंगळागौरीचे खेळ सादर केले जातील. यात एकूण २० संस्थांचा सहभाग असेल. वरील सर्व गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांनी दिलखुलासपणे सहभाग घ्यायचा आहे, असे आवाहन समितीने केले आहे.
योग, लोकनृत्य, दिंडी, मंगळागौरीचे खेळ या सगळ्यांमध्ये रंगमंचाच्या समोर जमलेले प्रेक्षक तिथेच सहभागी होऊ शकतील व आपल्या या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेऊ शकतील. त्याचप्रमाणे वारली चित्रकला, वेदाक्षर, स्वस्तिक- लक्ष्मीची पावले याप्रमाणे पारंपारिक चिन्ह, चैत्र महिन्यापासूनचे सण, त्याचप्रमाणे नऊवारी, बाराबंदी अशा पद्धतीचे कट आउट असे अनेक ऍक्टिव्हिटी व सेल्फी पॉईंट्स तयार केले जातील.
घरकुल म्हणजेच पारंपारिक जुन्या घरातील वस्तू पाटा वरवंटा, जातं यांबरोबर देखील छायाचित्रे काढणे, वस्तू वापरून पाहणे असा आगळावेगळा आनंद मिळू शकेल, या सर्वांची छायाचित्रे, चलचित्रफिती म्हणजे फोटोज आणि व्हिडिओज काढून दिल्या जाणाऱ्या हॅशटॅगबरोबर सर्वजण सोशल मीडियावर टाकता येतील, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.