आरोग्य यंत्रणा सतर्क; रोज २५०० चाचण्या

कळवा रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी विलगीकरण कक्ष सज्ज

ठाणे : कोरोनाने ठाणे शहर हद्दीत पुन्हा डोके वर काढल्याने महापालिकेची यंत्रणा सावध झाली आहे. कोरोना चाचण्यांमध्ये आता दीड हजाराने वाढ करण्यात आली असून रोज अडीच हजार चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय पालिकेच्या कळवा रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्ष देखील सज्ज करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोना संसर्गाने पुन्हा उसळी घेतली असून गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात ४० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये २८ रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले आहेत. शहरात रूग्ण संख्या ८५ वर गेली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी पालिकेची यंत्रणा सतर्क झाली असून शहरात चाचण्या वाढवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. बांगर यांनी शुक्रवारी आरोग्य विभागांची वाढत्या रुग्णसंख्येसंदर्भात एक महत्वाची बैठक घेतली असून यामध्ये त्यांनी हे निर्देश दिले आहेत.

ठाण्यात कोरोना उपचारासाठी तैनात केलेला कर्मचारी वर्ग संसर्ग आटोक्यात आल्यानंतर अन्यत्र वर्ग करण्यात आला होता. य कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलावण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी २४ तास आरटीपीसीआर चाचणी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या कुटूुंबियांची चाचणी करण्यात यावी. त्यांनी चाचणी करण्यास नकार दिला तर सहाय्यक आयुक्तांनी पथकासह घरी जाऊन त्यांची चाचणी करावी. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही चाचणी करण्यात यावी. बाधित रुग्णांसाठी घरात स्वतंत्र खोली आणि शौचालयाची व्यवस्था उपलब्ध नसेल तर त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात यावे, अशा सुचनाही त्यांनी केल्या आहेत. डायलेसीस सुरु असलेली व्यक्ती करोनाबाधित झाली तर, त्याला कळवा रुग्णालयातील उपचाराच्या ठिकाणी डायलेसीसची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

ठाणे शहरात एकूण ८५ सक्रीय रुग्ण असून त्यापैकी दोन खासगी रुग्णालयात तर तीन कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित ८० रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच विलगीकरणात आहेत. शहराच्या सर्वच भागात रुग्ण आढळून येत असले तरी कळवा-खारीगाव आणि मुंब्रा भागात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या भागांमध्ये करोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची काळजी घेण्याच्या सुचना बांगर यांनी दिल्या आहेत.

नातेवाईक न भेटल्यास रूग्ण आणखी खचतो

८२ वर्षीय व्यक्तीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांनी करोना लसीच्या तिन्ही मात्रा घेतल्या होत्या. परंतु त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब अशा सहव्याधी होत्या. त्यांचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यु झाला. उपचारादरम्यान त्यांचे कुटूंबिय त्यांना भेटण्यासाठी आले नव्हते. ही बाब रुग्णालय प्रशासनाने बैठकीत मांडताच रुग्ण आणि नातेवाईकांच्या संपर्कासाठी मदत कक्ष तयार करण्याची सुचना आयुक्त बांगर यांनी केली. कुटूंबिय किंवा नातेवाईकांशी बोलणे झाले नाही तर रुग्ण खचतो आणि त्यांची प्रकृती आणखी खालावते. असे होऊ नये यासाठीच मदत कक्ष सुरु करण्याची सुचना आयुक्तांनी केली.