भाईंदर : जागतिक महिला दिनानिमीत्त मागील दोन वर्षापासून ८ मार्च रोजी महिलांच्या सन्मानार्थ मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमध्ये दिवसभर मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते.
यावर्षी देखील ८ मार्च २०२३ रोजी आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ परिवहन मोफत सुविधेचा २५,८४० महिला प्रवाशांनी लाभ घेतला.
मीरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत मागील दोन वर्षापासून ८ मार्च “जागतिक महिला दिनानिमित्त” परिवहन सेवेच्या बसमधून दिवसभर मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली असून ८ मार्च २०२१ रोजी ११५५२ आणि ८ मार्च २०२२ रोजी २१,४६३ महिलांनी महानगरपालिकेच्या बसमधून मोफत प्रवास केला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महानगरपालिका परिवहन सेवेचा अधिकाधिक महिलांनी लाभ घेतला असून उत्तम असा प्रतिसाद दिला.
परिवहन उपक्रमाकडे सद्यस्थितीत ७४ बसचा ताफा उपलब्ध आहे. सध्या दैनंदिन ९५टक्के बसेस म्हणजेच ७० बस १८ बसमार्गावर चालविण्यात येत असून दैनंदिन निश्चित केलेल्या ९८टक्के फेऱ्या पूर्ण केल्या जातात. या ७० बसमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असून परिवहन सेवेने एका दिवसांत प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येचा ९०,०० पर्यंत टप्पा गाठलेला आहे.
शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी व हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी परिवहन उपक्रमात ५७ इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. तरी नागरिकांनी जास्तीत जास्त परिवहन उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांच्या वतीने करण्यात येत आहे.