अनावश्यक हॉर्नमुळे ठाण्यात ५५ टक्के ध्वनिप्रदूषण

* वर्षभरात ९८ हजार वाहनांची भर
* तीन महिने ‘नो हॉर्न’ मोहीम

ठाणे : ठाण्यात दरवर्षी पाच टक्के नवीन वाहने रस्त्यावर येत असून वर्षभरात तब्बल ९८ हजार वाहनांची भर पडली आहे. परिणामी रस्त्यावर हॉर्न वाजवण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. शहरात ५५ टक्के ध्वनिप्रदूषण हे अनावश्यक हॉर्न वाजवल्यामुळे होत असल्याचे उघड झाले आहे.

हॉर्न वाजवण्याचे प्रमाण असेच वाढत राहिले तर विविध शारीरिक व्याधींना नागरिकांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. वाहनचालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ठाणे आरटीओ, ठाणे महापालिका आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एन्ड यांच्या वतीने ‘नो हॉर्न’ ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. महिनाभर याविषयी समाजातील सर्वच घटकात या तीनही यंत्रणांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

ठाणे शहरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले असल्याने वाहनांची संख्या देखील झपाट्याने वाढली आहे. दुसरीकडे शहरात मेट्रो, रस्त्यांची दुरुस्ती, उड्डाणपूलाची कामे देखील सुरु असल्याने दररोज वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असलेल्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात हॉर्न वाजवले जात असल्याने केवळ अनावश्यक हॉर्न वाजवल्यामुळे ठाण्यात ध्वनिप्रदूषणाची पातळी ५५ टक्क्यांनी वाढली आहे. यासाठी ठाणेकरांनी जबाबदारीने हॉर्न वाजवावा यासाठी आरटीओ, ठाणे महापालिका आणि रोटरी क्लब या तिघांनी पुढाकार घेतला असून ‘नो हॉर्न ‘ ही विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात बुधवारी पत्रकार परिषद घेऊन या मोहिमेची माहिती देण्यात आली. या विशेष मोहिमेअंतर्गत  रहिवासी क्षेत्र, शैक्षणिक मंच, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्याशी समन्वय साधून जनजागृती करण्याचे काम रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंडतर्फे केले जाणार आहे, अशी माहिती या उपक्रमाचे समन्वयक चरणजीतसिंग जस यांनी दिली. विनाकारण हॉर्न वाजवला जातो, त्याचा आपल्याला त्रास होतो. सिग्नलला थांबलो असताना सतत हॉर्न ऐकू येतात. मात्र, एक जबाबदार नागरिक म्हणून हॉर्नचा वापर आवश्यक तेवढाच करायला पाहिजे, हे समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी जनजागृती केली पाहिजे. जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेतल्यास ‘नो हॉर्न’ ही मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त  संदीप माळवी यांनी व्यक्त केला.

अवजड वाहनांच्या बाबतीत चालकांमध्ये जनजागृती अभियान राबवण्यात येईल अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली.

२०२२-२३ या आर्थिक वर्षात आरटीओकडे नोंदणी झालेली वाहने

दुचाकी:६४८६१, रिक्षा: २७४२, चारचाकी: १९८७२, प्रवासी वाहने: २७२, मालवाहू वाहने: ८८३२, इतर: १५७६, एकूण: ९८१५५