राष्ट्रवादीच्या चार पदाधिकाऱ्यांना जामीन मंजुर

ठाणे : ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चौघा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मंगळवारी ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणात नाव असलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीच न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

समाज माध्यमात प्रसारित झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिपमध्ये ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचाच आवाज असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर महेश आहेर यांना मारहाण केली. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशंत गायकवाड व इतर दोन जणांवर भादंवि कलम 120 (ब), 353, 332, 307, 506 (2), 143, 148, 149 व आर्म ऍक्ट आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड या चौघांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने चौघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यात नाव असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयाने अटी शर्तींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. दरम्यान, अटकेत असलेल्या चौघा जणांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने राष्ट्रवादीच्या चारही पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंगळवारी जामीन मंजूर केला.