साठवणुकीतल्या कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण

नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी  घाऊक बाजारात साठवणुकीतील जुन्या कांद्याची आवक वाढली आहे. आवक जरी वाढत चालली असली तरी कांद्याचा दर्जा अधिक चांगला नसल्याने या कांद्याला उठाव नाही. परिणामी  दरात घसरण होत असून  कांदा  ५ ते १० रू प्रतिकीलोने विकला जात आहे.सोमवारी बाजारात १३५ गाड्या कांदा आवक झाली होती.

मागील दीड ते दोन महिने राज्यात पडलेल्या थंडीमुळे कांदा उत्पादनास पोषक वातावरण तयार झाल्याने  कांदा उत्पादनात  वाढ होत आहे. त्यामुळे नवीन कांदा साठवणूक करण्यास शेतकऱ्यांकडे जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणीतला कांदा बाहेर काढला आहे. मात्र सदर कांदा जुना असल्याने त्यात पाला अधिक  निघत आहे. परिणामी या कांद्याला उठाव मिळत नसल्याने दरात मोठी  घसरण होत चालली आहे. तर ही घसरण अजून पंधरा ते वीस दिवस राहणार असल्याची शक्यता येथील कांदा बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केली आहे.

बटाटाही कांद्याच्या बरोबरीने कांद्या सोबतच बटाटा उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर  बाजारात येणारा बटाटा हा परिपक्व नसल्याने या बटाट्याला उठाव कमी आहे. त्यामुळे वाशीतील एपीएमसी  घाऊक बाजारात बटाट्याच्या दरात देखील घसरण होत चालली असून बटाटा ७ ते १३ रू प्रतिकिलो विकला जात आहे. सोमवारी बाजारात परराज्यातील ८५ गाड्या बटाटा आवक झाली होती.