उत्तरपत्रिका तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बहिष्कार

ठाणे : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आवाहनानुसार मंगळवारी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी बहिष्काराची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यामुळे नियोजित केलेली इंग्रजी विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक यामुळे होऊ शकली नाही.

शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे तातडीने शिक्षकांच्या समस्यांचे निवारण करतील, अशी अपेक्षा शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई, ठाणे आदी जिल्ह्यांत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची १२ वीची परीक्षा एकाचवेळी सुरू झाली आहे. राज्यात सुमारे १४ लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असून, मंगळवारी त्यांचा इंग्रजीचा पेपर होता. परीक्षा सर्वत्र सुरळीत पार पडली. परंतु महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आवाहनानुसार उत्तरपत्रिका तपासणी बहिष्काराची प्रक्रिया सुरू झाली व नियोजित केलेली इंग्रजी या विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक या बहिष्कारामुळे होऊ शकली नाही.
सर्व नियामकांनी बहिष्कार आंदोलनात सहभागी असल्याचे पत्र राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांना सादर केले आहे.

इंग्रजीच्या मुख्य नियामक मंडळाची सभा होऊ न शकल्यामुळे मंगळवारी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील सहा गुणांचे प्रश्न न छापता उत्तरे छापली गेल्यामुळे, त्याचे गुणांकन कसे करायचे याचा निर्णय घेण्यासाठी राज्य शासनावर नामुष्की आली आहे.  महासंघाचे सचिव प्रा. संतोष फाजगे, कार्याध्यक्ष प्रा अविनाश तळेकर,  उपाध्यक्ष प्रा सुनील पूर्णपात्रे,  प्रा. शहापुरे, प्रा. तुकाराम साळुंखे, प्रा. राहुल गोलांदे , प्रा. अतुल पाटील, प्रा. शांतीलाल खाडे आणि इंग्रजी विषयाच्या अभ्यास मंडळ सदस्या प्रा. स्मिता वर्पे व राज्यातील सर्व मुख्य नियामक सदस्य उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना वेठीस धरु नका..त्यांचे मानसिक संतुलन ढळेल – डॉ. प्रा. जयप्रकाश घुमटकर

शिक्षण क्षेत्रातील महत्वाचा घटक विद्यार्थीच आहे. चांगले, उत्तम गुण मिळवण्यासाठी हेच विद्यार्थी वर्षभर मन लावून अभ्यास करत असतात. त्यांची ‘परीक्षा’ परिक्षेच्या आधी आणि नंतर गुण किती मिळणार यासाठी असते. त्यांनी केलेली मेहनत गुणांच्या आधारे दिसून येते., जर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या गुणपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला तर त्यांचे मानसिक संतुलन ढासळण्याची भिती आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बहिष्कार करणा-या शिक्षकांच्या मागण्या  मान्य कराव्यात,असे आर्जव शिक्षण तज्ज्ञ डॉ.प्रा. जयप्रकाश घुमटकर यांनी केले आहे.