संजय राऊतांविरोधात नाशिकनंतर ठाण्यात गुन्हा

ठाणे: ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकनंतर आता ठाण्यातील नगर पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात ठाण्यातील शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली असून त्यांच्याविरोधात रविवारी (19 फेब्रुवारी) संध्याकाळी आंदोलन केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरुन नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.