ठाणे : ठाणे महापालिकेत कर्मचाऱ्यांची मेगाभरती होणार आहे. तब्बल ३०० लिपिकांचा त्यामध्ये समावेश असून १७३८ विविध पदे भरली जाणार आहेत.
राज्य सरकारने महाराष्ट्रातील सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. राज्यात ७५ हजार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या ४५००रिक्त जागांपैकी १७३८ जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये ३०० लिपिक, २५० परिचारिका, २४ कनिष्ठ अभियंता, सुमारे ८०० वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यात येणार आहेत. तशी माहिती राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला पाठवली असून राज्यातील १८ महापालिकांमधील भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी त्या-त्या महापालिकेवर सोपवली आहे.
भरती प्रक्रिया राबविण्यात येत असताना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी खासगी संस्थेकडे ही प्रक्रिया सोपविण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेतील भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सीमार्फत राबविण्यात येणार आहे. उमेदवारांना अर्ज सादर करावे लागणार आहेत. ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे, मुलाखती मात्र घेतल्या जाणार नसल्याचे बोलले जात आहे. त्या-त्या पदाकरिता उमेदवारी अर्ज सादर झाल्यानंतर त्याची छाननी देखील टाटा कन्सल्टन्सी करणार असल्याने या भरती प्रक्रियेत ठाणे महापालिकेतील अधिकारी, माजी पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना हस्तक्षेप करता येणार नाही असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले. पुढील एक ते दोन महिन्यांत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे ते अधिकारी म्हणाले.
ठाणे महापालिकेत अधिकाऱ्यांना अनेक विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे. मागील दोन वर्षात अर्धी महापालिका निवृत्त झाली आहे, त्यामुळे लिपिकांची वानवा जाणवत आहे. त्याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.