ठामपा शाळांमधील स्वच्छतागृहे अद्ययावत करणार

संग्रहित

ठाणे : शहरातील सार्वजनिक शौचालयांबरोबरच महापालिकेच्या इमारतीतील शौचालये आणि पालिका शाळांमधील स्वच्छतागृह सोयी-सुविधांनी अद्ययावत करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.

दोन महिन्यांपूर्वी महापालिका मुख्यालयाच्या चारही मजल्यावरील शौचालयांची पाहणी केल्यानंतर चांगल्या दर्जाच्या फरश्या, दैनंदिन साफसफाई, दुर्गंधीमुक्त, पूर्णवेळ देखरेख करणारा कर्मचारी नेमावा आदी बदल करणेबाबत सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानुसार घनकचरा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी महापालिकेच्या इमारतीतील शौचालयांच्या दुरूस्तीचे काम हाती घेवून अद्ययावत सुविधांसह तळमजल्यावरील शौचालयाचे नुतनीकरण केले.

आयुक्त श्री. बांगर यांनी मंगळवारी महापालिकेच्या तळमजल्यावरील नुतनीकृत शौचालयाची पाहणी केली. त्यावेळी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त तुषार पवार उपस्थित होते. याच धर्तीवर महापालिकेच्या सर्व शाळांमधील शौचालयांचे नुतनीकरण करण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी दिले. तळमजल्यावर असलेले सर्वाधिक वापरले जाणारे हे शौचालय आहे. त्याचे काम चांगले झाले असून ते नियमित दुर्गंधीमुक्त शौचालय राखणे ही जबाबदारी देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहे. त्यात कोणतीही तडजोड नको असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था सुधारण्याचा आग्रह आपण धरतो. त्याचबरोबर आपला वावर असलेल्या कार्यालयातील शौचालयांची स्थिती चांगलीच असली पाहिजे व ती नियमित राहील याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या शौचालयाच्या धर्तीवर पालिकेतील सर्व शौचालय सुधारण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच, महिलांच्या प्रसाधनगृहांचीही याच पद्धतीने सुधारणा केली जावी, असे आयुक्त श्री. बांगर म्हणाले.