कल्याण : लोकाभिमुख प्रकल्प देण्याचे काम आपले सरकार करत आहे. विकसकाम करणारे सरकार आहे, मुख्यमंत्री तुमचाच आहे. कष्टकरी लोकांमधील संकट दूर होऊन ते सुखी झाले पाहिजे, सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी कल्याण पश्चिमेतील विविध प्रकल्पांच्या लोकार्पण वेळी दिली.
कल्याणमधील प्रबोधनकार ठाकरे सरोवरातील मा. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेऊन नतमस्तक होऊन प्रबोधनकार सरोवराच्या नुतनीकरणाच्या कामाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरोवरात लेझर शो चे देखील लोकार्पण करण्यात आले. या सरोवरात सुरु झालेला लेझर शो हा राज्यातील दूसरा लेझर शो आहे. बीएसयुपी प्रकल्पतील प्रकल्प ग्रस्तांना चावी वाटप करण्यात आले. मलशुद्धिकरण केंद्राचे लोकार्पण डिजिटल पद्धतीने यावेळी करण्यात आले. तसेच केडीएमटी अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी आदेशाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर दिव्यांगांना व्हिलचेअरचे वाटप कल्याण पश्चिम येथील यशवंतराव चव्हाण मैदानात करण्यात आले.
यावेळी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, कल्याण लोकसभा खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय शिंदे, पालिका आयुक्त आदींसह माजी नगरासेवक नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कल्याण शहर शाखेतर्फे मुख्यमंत्र्यांचे सत्कार करण्यात आला. कल्याणमध्ये सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारावे, यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
कल्याणमधील प्रबोधनकार ठाकरे सरोवर हा ऐतिहासिक तलाव असून या ठिकाणी ज्या अधिक सुविधा करता येतील त्या कराव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. घर हे प्रत्येकाचं स्वप्न असते आणि म्हणून ते देण्याचे काम आज कल्याण-डोंबिवलीमध्ये झाले आहे. मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरांप्रमाणे कल्याण डोंबिवलीसह एमएमआरला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे ही आपली भूमिका आहे. खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे एमएमआर रिजनमधील रस्ते देखील खड्डेमुक्त करू, असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
बीएसयूपीच्या घरे वाटप होत आहे हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. ही घरे चांगली असून येथे सर्व सुविधा आहेत पायाभूत सुविधांसह नागरिकांना समाधानाचे आयुष्य जगता यावे, त्यांचे स्टॅंडर्ड ऑफ लिविंग वाढावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
राज्य सरकार व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कल्याणमध्ये चांगले काम होत आहे. अथक प्रयत्नांनंतर बीएसयुपीची घरे आज पात्र लाभार्थ्यांना मिळत आहेत. प्रबोधनकार ठाकरे सरोवराच्या सुशोभीकरणामुळे कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, असे उद्गार केंद्रीय पंचायती राजमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात काढले.
आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रकल्पग्रस्तांचा बीएसयुपीमध्ये मोफत घराचा प्रश्न खासदार श्रीकांत शिदे यांनी मार्गी लावल्याबद्दल कौतुक करीत पिण्याच्या पाण्यासाठी कल्याण डोंबिवली मनपासाठी स्वतंत्र धरण असावे, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करीत शहराचा चेहरामोहरा बदलणारे रस्ते, रिंग रूट या विकास कामाचे कौतुक केले.