मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आज कल्याण, उल्हासनगरात

कल्याण: कल्याण आणि उल्हासनगर शहरातील १०५.६ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, १५ फेब्रुवारी रोजी कल्याण आणि उल्हासनगरमध्ये येणार आहेत.

कल्याण शहरातील बीएसयुपी घरांचे वाटप, भगवा तलावाचे (काळा तलाव) लोकार्पण आणि प्रबोधनकार ठाकरे नामकरण, दोन मलशुद्धीकरण केंद्रांचे लोकार्पण तसेच विविध योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान आणि वस्तू वाटप अशा गोष्टींचा शुभारंभ कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उल्हानगरमधील स्वच्छ भारत अभियानातंर्गत विविध वाहनांचे लोकार्पण, मलनिःसारण केंद्र, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन यांसह विविध कामांचा शुभारंभ यावेळी केला जाणार आहे. खासदारडॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागले आहेत.

कल्याणमधील भगवा तलावामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १९.७६ कोटी रुपयांच्या निधितून सुशोभीकरणाचे कामकरण्यात आले आहे. धावते विजेचे कारंजे, पाणतळ अशा सुविधा काळा तलावात उभारण्यात आल्या आहेत. प्रबोधनकार ठाकरे सरोवर म्हणून तलावाचे नामकरण केले जाणार आहे.

विविध विकास प्रकल्पांमध्ये बाधित प्रकल्पग्रस्तांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील प्रकल्पात घरे देण्याचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. यामध्ये ३९७ सदनिका आणि ११९ व्यापारी गाळे देण्यात येणार आहेत. वाडेघर आणि आंबिवली भागात वाढत्या नागरीकरणाचा विचार करुन ४६.१ कोटी रुपयांच्या निधीतून दोन नवीन मलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत ज्या फेरीवाल्यांना कर्ज मंजूर झाले आहेत. तर धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रम अंतर्गत सुमारे १० हजार लाभार्थ्यांना विविध योजना आणि वस्तूंचे वाटप केले जाणार आहे.

पहिल्यांदाच उल्हासनगर शहरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. स्वच्छ भारत अभियानातील वाहने (२२.७२ कोटी), विद्युत वाहनांचे चार्जिंग स्थानक (५३.८७ लाख), आणि खडेगोळवली येथील मलनिस्सारण केंद्र (१२.४२ कोटी), अशा कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यावेळी दिव्यांग व्यक्तीसाठी संगणक प्रणालीआणि श्वान निर्बिजीकरण केंद्राचे देखील लोकार्पण करण्यात येणार आहे.

या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा कल्याण येथून सायंकाळी ६ वाजता सुरु होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे.