हरवत चाललेल्या संवेदना….

मानवाचे आयुष्य किती क्षणभंगुर असते याची प्रचिती कोरोना काळात आली असताना त्याचा पुन:प्रत्यय तुर्कस्तान-सिरियातील विनाशकारी भूकंपांमुळे आला आहे. सुमारे वीस हजार नागरीकांचा बळी घेणाऱ्या निसर्गाच्या या कोपामुळे माणसाचा मृत्यूच्या अटळपणावरील विश्वास दुर्दैवाने वाढला आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये. इतके असूनही माणूस किती बेफिकीरपणे आयुष्याकडे पहातो याचा पुरावा भूकंपाच्या विनाशकारी बातमीशेजारी प्रसिद्ध झालेल्या सवंग बातम्यांवरुन दिसते.
या सार्वत्रिक बोथटपणावर चिंता व्यक्त होईल अशी अपेक्षा आहे. आजचा हा स्तंभ या ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज देणाऱ्या या निष्पाप बहीण-भावांना (फोटो पहा) समर्पित आहे. ती वाचून आपण हरवलेल्या संवेदना आपणच उद्ध्वस्त केलेल्या तकलुबी मानवी मनोऱ्यांच्या ढिगाऱ्याखालून शोधू या.
भूकंप
भूकंपात कोसळलेल्या घराच्या छताखाली
तीच आता धाकट्याची
बनली आहे आई
मृत्युच्या तांडवाने घेतला असेल
आई-बाबांचा बळी
नसेल तेही या चिमुरड्यांच्या गावी…
रात्री अंगाई गाऊन निजवणारी आई
वाईट स्वप्न पडताच धीर देणारी आई
अंगावरचे पांघरूण नीट करणारी आई
संकटसमयी हक्काने बिलगू देणारी आई
आज गेली असेल कुठे
पोटच्या गोळ्यांना टाकूनकी असेल रोजच्याप्रमाणे
स्वैपाकघरात जेवण करीत?
मन मानायला तयार नव्हते
आईने असे सोडून जायला नको होते
निष्पाप जीवांची कोवळी फिर्याद
नियतीकडेही नसेल त्याचे उत्तर
ढिगारा उपसण्याचे काम सुरूच आहे
अजस्त्र यंत्रांचे अजस्त्र हात
काढत आहेत मृत्युच्या दाढेत अडकलेले जीव
काही चिरनिद्रा घेणारी प्रेते
आपले हात मात्र प्रार्थनेत जोडलेले
या दोघांसाठी
अश्रू आणि कुतुहल
केव्हाच संपले आहे लुकलुकणाऱ्या डोळ्यांतून
धुळींचे लोट उडतच आहेत
मनाची चलबिचल वाढत आहे
घड्याळाचे काटे निर्विकारपणे पुढे सरकत आहेत
मृत्युचे आकडे क्षणाक्षणांनी
वाढतच चालले आहेत
दिवस मावळला आहे
संध्याकाळ कवेत घेऊन
रात्र अंधारात आहे
कुशीत घेऊन निजवणाऱ्या आईचा
डोळ्यांसमोर चेहरा आणित
भावाच्या कपाळावर हात ठेवत
ही छोटी आई
नियतीलाच जणू आव्हान देत आहे……
हे वसुंधरे इतकी निष्ठूर
कशी झालीस तू?