दहशतवाद हा देशासमोरील गंभीर प्रश्न असून त्याला ठेचण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत. लखनौच्या एनआयए, एटीएस न्यायालयाने दहा महिन्यापूर्वीच्या गोरखनाथ मंदिरातील हल्ल्याप्रकरणी दोषी असलेला दहशतवादी अहमद मुर्तजा अब्बासीला फाशीची शिक्षा सुनावली. त्याने गेल्या वर्षी 4 एप्रिलला मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेलया पीएसी जवानावर हल्ला केला. यावेळी दहशतवाद्याने जवानाची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्नही केला. पण जवानांनी धाडसी कामगिरी करत त्याला घटनास्थळी पकडले. पुरावे आणि साक्षीदाराच्या आधारावर न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा सुनावली.
मुर्तजाने इसीसच्या विचारसरणीला भारावून जात जिहादच्या उद्देशाने भारत सरकारविरुद्ध अघोषित युद्ध पुकारले. त्याने देशाच्या ऐक्याला आणि अखंडतेला आव्हान दिले. म्हणूनच न्यायालयाने दहशतवाद्याला मरेपर्यंत फाशी देण्याची शिक्षा सुनावली आहे. मुर्तजाचा हल्ला हा लोन वुल्फ अटॅक शैलीचा मानला गेला आहे.लोन वुल्फ अॅटेक हा दहशतवादाचा नवीन चेहरा म्हणून समोर आला आहे. कट्टर दहशतवादी संघटना या लोन वुल्फ शैलीचा आधार घेत हल्ले घडवून आणतात. मुर्तजा हा काही गरीब कुटुंबातील मुलगा नाही. तो गोरखपूर येथील श्रीमंत कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहे. त्याचे कुटुंब सिव्हिल लाइन्समध्ये राहते.
मुर्तजाने सामान्य संस्थेतून नाही तर आयआयटी मुंबईतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. या संस्थेतील विद्यार्थी अतिशय बुद्धिमान म्हणून मानले जातात. त्याचे वडिल अनेक बँकांचे अणि आंतरराष्ट्रीय कंपन्याचे कायदेविषयक सल्लागार आहेत. काका डॉ. के.ए. अब्बासी हे शहरातील नामांकित डॉक्टर आहेत. ते सिव्हिल लाइन पार्क रोड येथे अब्बासी नर्सिग होम चालवतात. एवढेच नाही तर आजोबा गोरखपूर जिल्ह्याचे न्यायाधीश होते. त्याचा भाऊ हा प्रसिद्ध चार्टड अकाऊंटट आहे.
प्रश्न असा की, आयआयटीएन्स असणारा मुर्तजा हा जिहादी कसा बनला? त्याचे इसिसशी कसे लागेबांधे जुळले? धार्मिक कट्टरपंथाने त्याला दहशतवादी केले. तो सीरियाला जाण्याच्या तयारीत होता. कट्टरपंथी विचारसरणीमुळे आजही तरुणांच्या डोक्यात विष कालवले जाते. समाजकंटक लोक जिहाद पुकारण्यासाठी प्रोत्साहित करतात. दुसर्या धर्माच्या लोकांना काफिर सांगतात. स्वत:ला इस्लाम धर्माचे संरक्षक मानतात. निष्पाप तरुणांच्या मनावर कट्टरपंथी विचारसरणी बिंबवतात. हा विचार वाढण्यामागचे कारण म्हणजे लोकांनी त्याच्या विरोधात आवाज बुलंद केला नाही. मात्र आता स्थितीत बदल झाला आहे. संपूर्ण जग दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र झाले आहे. धर्माच्या नावावर दहशतवादी संघटना या युवकांच्या हाती बंदूक सोपवतात ही बाब जगाला कळून चुकली आहे. दुर्दैवाने मुस्लिम समाजातील दहशतवाद्यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्याकडे धर्माच्या चष्म्यातून पाहत न्यायालयाच्या निर्णयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न काही भारतीय करतात. परंतु धर्मनिरपेक्ष भारताची न्यायव्यवस्था ही एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा सुनावते तेव्हा ती शिक्षा हिंदू किंवा मुस्लिम म्हणून नाही तर भारतीय नागरिक म्हणूनच दिली जाते, हे लक्षात घेतले पाहिजे. न्यायव्यवस्थेला देशातील राजकीय व्यवस्थेशी काही देणेघेणे नसते. त्यास केवळ घटना आणि कायद्याची चौकट याच्याशी संबंध असतो. या तावडीत कोणत्याही धर्माचा व्यक्ती सापडो, त्याला शिक्षा होणारच. परंतु चांगल्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेणार्या तरुणांच्या मनातील विषारी मानसिकता संपुष्टात आणणे हा खरा प्रश्न आहे. या प्रभावाखाली येऊन हुशार विद्यार्थी बंदुका हातात घेतात. भारतातील नागरिकांनी आणि कुटुंबानी अशी विखारी मानसिकता वेळीच ओळखणे गरजेचे असून त्यापासून दूर राहणे आवश्यक आहे. दहशतवादाविरोधात सर्वांनी ऐक्य दाखवणे गरजेचे आहे.