पवारांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या १३ नगरसेवकांची दांडी

ठाणे: गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फुटणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते दस्तुरखुद्द अजित पवार यांनी बुधवारी बोलावलेल्या नगरसेवकांच्या बैठकिला १३ माजी नगरसेवकांनी दांडी मारल्याचे समजते.

या बैठकीत अजित पवारांनी आपल्या भाषेत नगरसेवकांचे चांगलेच कान टोचले. आ.आव्हाड यांना निवडणुकीदरम्यान अटक होण्याची शक्यता व्यक्त करून आ. आव्हाड यांच्याशिवाय निवडणूक लढण्याची तयारी ठेवा, असा कानमंत्र दिला.

या बैठकीला अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते.

आगामी ठाणे पालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाने जोरदार प्रयत्न सुरू केले असून ठाण्यात नवीन राजकीय खेळी खेळण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यात ३४ नगरसेवक असून आगामी महापालिकेचा महापौर ते ठरवणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातील माजी नगरसेवकांना बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाकडून गळाला लावले जाणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नगरसेवक हणमंत जगदाळे यांना फोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असून आव्हाड यांच्या मतदरसंघांतील राजन किणी यांच्यासह सात नगरसेवक गळाला लागले आहेत. त्यांचा पक्षप्रवेश पुढील १० ते १२ दिवसात होण्याची शक्यता असल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी श्री. पवार यांनी बैठक बोलावली होती. परंतु फुटणारे नगरसेवक बैठकीलाच आले नाहीत.

या बैठकीत आ. आव्हाड यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येणार असल्याची भीती व्यक्त करून त्यांच्या शिवाय निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी लागेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

पक्षाच्या नेत्यांनी बोलवलेली बैठक होती. यामध्ये ठाण्यातले माजी नगरसेवक उपस्थित होते. माजी नगरसेवक नजीब मुल्ला हे पक्षाच्या कामानिमित्त दिल्ली येथे असल्याने ते येऊ शकले नाहीत. मात्र राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ असून आगामी निवडणुकीत पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्व काम करणार आहेत, अशी प्रतिक्रिया
आनंद परांजपे यांनी दिली.

नजीब मुल्ला हे शिंदे गटात जाणार अशी चर्चा असताना मंगळवारी अजित पवारांनी घेतलेल्या बैठकित मुल्ला उपस्थित नव्हते. तर मुल्ला यांनी सोशल मीडियावर ते शरद पवारांसोबत दिल्लीत असल्याची एक पोस्ट केली आहे.