माथेरानच्या पर्यटकांसाठी ‘एसी’ आठ आसनी सलून कोच

नेहमीच्या टॉय ट्रेनला जोडणार

ठाणे : मुंबई, ठाणे, पुणे आदी  भागांमधून माथेरानला येणा-या हजारो पर्यटकांसाठी मध्य रेल्वे प्रवाशांच्या आनंददायी प्रवासासाठी माथेरान टॉय ट्रेनला विशेष एसी सलून कोच जोडणार आहे. हा कोच आठ आसनी कोच असून नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवशी त्याचप्रमाणे रात्रीच्या मुक्कामासाठी बुकिंगसाठी उपलब्ध असेल.  ट्रेनच्या वेळा आणि एसी सलून कोचचे शुल्क ‘म.रे’ने जाहीर केले आहे.

नेरळ प्रस्थान सकाळी 8.50  वा. माथेरान आगमन स. 11.30 वा. आणि नेरळहून प्रस्थान सकाळी 10.25 वा. माथेरानला आगमन दुपारी 1.05 वा. माथेरान ते नेरळ ट्रिप : माथेरान प्रस्थान दुपारी 2.45 वा. नेरळ आगमन दु. 4.30 वा. /माथेरान प्रस्थान दु. 4 वा.नेरळला आगमन सायं. 6.40 वा.

एकाच दिवशी राऊंड ट्रिप पूर्ण होईल. आठवड्यातील दिवशी रु. ३२,०८८/- करांसहीत. आठवड्याअखेरीस (वीकेंडला) रु. ४४,६०८/- करांसह. तसेच एकाच दिवसाच्या राऊंड ट्रिपच्या प्रवासासाठी, ए+सी किंवा बी+डी यापैकी एकाचा पर्याय निवडता येतो. रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप: आठवड्यातील दिवशी रु. ३२,०८८/- करांसहीत + रु. १,५००/- प्रति तासाने आणि आठवड्याच्या अखेरीस (वीकेंडला) रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप प्रवासासाठी रु. ४४,६०८/-  करांसह + डिटेंशन शुल्कासह रु. १,८००/- प्रति तासाने. प्रवासी कोणताही ए किंवा बी आणि  परतीसाठी सी किंवा डी यापैकी एक पर्याय निवडू शकतात.

इच्छुक प्लॅनच्या एकूण भाड्याच्या २०% आगाऊ रक्कम भरून प्रवासाच्या तारखेच्या ७ दिवस अगोदर रु. १०,०००/- परत करण्यायोग्य सुरक्षा ठेवीसह एसी सलून बुक करू शकतात. उर्वरित ८०%  प्रवासाच्या तारखेच्या ४८ तास अगोदर रक्कम  भरावी लागेल, असे न केल्यास आगाऊ रक्कम आणि सुरक्षा ठेव जप्त केली जाईल आणि बुकिंग रद्द झाली  असे मानले जाईल.  ४८ तासांच्या आत बुकिंग रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जाणार नाही.

नेरळचे मुख्य बुकिंग पर्यवेक्षक किंवा मध्य रेल्वेवरील कोणत्याही जवळच्या स्थानकांवर युपीआय, पीओएस किंवा रोख रकमेद्वारे बुकिंग करता येते. नेरळ व्यतिरिक्त अन्य स्थानकांवर पैसे  भरले असतील तर पैसे पावती क्रमांक नेरळ कार्यालयाला जमा केल्याच्या  १ दिवसाच्या आत कळवावे. अधिक माहितीसाठी नेरळच्या मुख्य बुकिंग पर्यवेक्षकांशी संपर्क साधा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.