कोकण शिक्षक मतदार संघावर भाजपने उधळला गुलाल

ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय

नवी मुंबई : कोकणातील पाच जिल्ह्यातील शिक्षकांचा मतदार संघ असलेल्या कोकण शिक्षक मतदार संघात शेकापच्या बाळाराम पाटील यांचा भाजप पुरस्कृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दहा हजार मतांनी पराभव केला. नेरूळ येथे मत मोजणी केंद्रात म्हात्रे यांना विजयी घोषित केल्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत गुलाल उधळला.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यातील ३५ हजार शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सर्वाधिक मतदान ठाणे जिल्ह्यात असल्याने विजयाची मदार ठाणे जिल्ह्यावर अवलंबून होती. मूळचे बदलापूर येथील ज्ञानेश्वर म्हात्रे यांना बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा पाठींबा होता.भाजपने पाठींबा दिलेल्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २० हजार ६४७ तर बाळाराम पाटील यांना १० हजार ४४२ मते मिळाली. विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा पराभव करत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दणदणीत विजय मिळवला.

कोंकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आठ उमेदवार रिंगणात होते. यात खरी लढत भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे आणि महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांच्यात होती.

एकूण १३ उमेदवारी अर्जांपैकी पाच उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले  होते. यात वेणू कडू यांना भाजपच्या नेत्यांनी गळ घालून माघार घेण्यास सांगितल्याने म्हात्रे यांच्या विजयातील अडसर दूर झाला होता, त्यामुळे एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ज्ञानेश्वर म्हात्रे आणि बाळाराम पाटील यांचा अपवाद वगळता उर्वरित उमेदवारांना अवघ्या तीन हजार मतांचा देखील पल्ला गाठता आलेला नाही.

३० जानेवारी, २०२३ रोजी मतदान झाल्यानंतर आज नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी करण्यात आली. अवघ्या तीन तासात मतमोजणी पूर्ण झाली. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य) मनोज रानडे यांनी त्यांच्या विजयाची घोषणा केली. शिक्षक मतदारसंघ विभागात एकूण ९१.०२ टक्के मतदान होऊन ३५ हजार ७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला होता. विभागामध्ये १७ हजार ९ पुरुष तर २१ हजार ५२० स्त्री मतदार असे एकूण ३५ हजार ५२९ शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी १६ हजार १२८ पुरुष तर १८ हजार ९४२ स्त्री  असे एकूण ३५ हजार ७० शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

सर्वाधिक मतदान हे ठाणे जिल्ह्यात असल्याने ठाणे जिल्ह्याला अधिक महत्व होते.

ठाणे जिल्ह्यात ८८.८६ टक्के मतदान झाले होते. ६ हजार २९ पुरुष तर ९ हजार २७१ स्त्री मतदार असे एकूण १५ हजार ३०० शिक्षक मतदारांपैकी ५ हजार ६३४ पुरुष तर ७ हजार ९६१ स्त्री  असे एकूण १३ हजार ५९५ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

कोकण शिक्षक आमदार निवडणूक उमेदवारांना मिळालेली एकूण मते.

एकूण मतदान- ३५२६९

वैध –  ३३६५०

अवैध – १६१९

विजयाचा कोटा – १६७२६

1) म्हात्रे ज्ञानेश्वर – २०६८३

2) धनाजी पाटील –  १४९०

3) रोहोकर उस्मान – ७५

4) भालेराव तुषार – ९०

5) रमेश देवरूखकर – ३०

6) बाळाराम पाटील – १०९९७

7) सोनवणे – ६३

8) संतोष डामसे – १६