‘टीसा’च्या अध्यक्षा सुजाता सोपारकर यांचे प्रतिपादन
ठाणे : भारताची अर्थव्यवस्था ही जगातील ५व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पाचवा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १ फेब्रुवारी रोजी २०२३ -२४ साठी सादर केला आहे.
लघुत्तम लघु मध्यम उद्योजकांसाठी एप्रिल 2023 पासून सुधारित क्रेडिट हमी योजनेच्या कॉर्पसमध्ये सुमारे 9,000 कोटी रुपये ओतल्याने ह्या योजनेमुळे दोन लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त हमी न देता क्रेडिट मिळणार असल्याने लघुउद्योजकांना सक्षम होण्यास मदत होईल तसेच शुल्कात एक टक्क्याने कपात केल्याने लघुउद्योजकांच्या खर्चात बचत होईल, असे मत ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर यांनी व्यक्त केले.
मोठ्या कंपन्यांनी लघुत्तम लघु मध्यम उद्योगांचे पेमेंट केल्यानंतरच केलेल्या पेमेंटवर झालेल्या खर्चाची वजावट मोठया कंपन्यांना घेता येईल त्यामुळे लघु उद्योजकांना पेमेंट वेळेवर मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल ही मागणी आम्ही प्रामुख्याने केली होती.
नवीन सहकारी संस्थांनी 31 मार्च 2024 पर्यंत उत्पादन प्रक्रिया प्रकल्प सुरू केल्यास 15 टक्के कमी कर दराचा लाभ मिळू शकेल, जो सध्या नवीन उत्पादक कंपन्यांना उपलब्ध आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४साठी २.४० लाख कोटी रुपयांची तरतूद रेल्वेसाठी करण्यात आल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. रेल्वेच्या नव्या योजनांसाठी ७५ हजार कोटी रुपयांचा निधी केल्याने स्वतंत्र कॉरिडॉरचे काम जलद गतीने होतील त्यामुळे मालाची वाहतूक ट्राफिकमध्ये न अडकता वेळेत माल पोहोचण्यास मदत होईल. भिवंडी परिसराची वाढ मोठ्या प्रमाणात होत असून ह्यापूर्वी मंजूर झालेले पिंपळास रेल्वे स्टेशनचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे ही मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत त्याकडे लक्ष देण्याची मागणी सोपारकर यांनी केली.
यावेळी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना प्राधान्य दिल्याचे दिसत आहे . शेतीमधील सुधारणांसाठी निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा केल्या. डिजीटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ऍग्रीकल्चरची घोषणा केली आहे सहकाराच्या माध्यमातून आत्मनिर्भर क्लीन प्लांट योजना इत्यादी आणि *ग्रामीण भागातील तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी स्टार्टअपला कृषी एक्सीलरेटर फंड स्थापन करण्यात येणार असल्याने चालना मिळेल, असेही सोपारकर म्हणाल्या.