ठाणे : ठाणे परिवहन सेवेत नवीन वर्षात १२३ इलेक्ट्रिक आणि २० सीएनजी बस दाखल होणारआहेत. परिवहन समिती सदस्यांनी नुकताच हैद्राबाद दौरा केला होता. यात काही बस गळत असल्याच्या तर काहींमध्ये कमी दर्जाचे इंजिन बसविले गेले असल्याची माहिती पाहणीत समोर आली. या त्रुटी दूर करुन बस चांगल्या स्थितीत आणि करारानुसार सुविधा देण्याच्या अटीवर या बसचा ठाण्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
परिवहनच्या ताफ्यात नव्या वर्षात टप्याटप्याने नवीन बस दाखल होणार आहेत. या बस लखनौ आणि हैद्राबाद येथील कंपनीतून विकत घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी वागळे, कळवा आणि मुल्ला बाग या डेपोतील पाच पर्यवेक्षक लखनौ आणि हैद्राबादला जाऊन आले. मात्र त्यांना या बसविषयी काहीच माहिती देता आली नाही. त्यामुळे परिवहन सदस्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान मागील महिन्यात परिवहन समिती सदस्य हे हैद्राबाद येथे इलेक्ट्रीक बसच्या पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी प्रत्येक बस तपासून घेतल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यानुसार बसचे इंजिन, आकार, बसला गळती आहे का? याची प्रत्यक्ष पाहणी देखील त्यांनी केली. यावेळी बसमध्ये बसून सदस्यांनी बाहेरुन पाणी टाकण्यास सांगितले. त्यानुसार काही बसमध्ये गळती असल्याचे दिसून आले. तसेच इंजिन देखील काही बसमध्ये कमी क्षमतेचे दिसून आले. इतर काही त्रुटी देखील निदर्शनास आल्या. त्या त्रुटी दूर करुन ठाणेकरांना चांगल्या बस द्याव्यात असे सांगण्यात आले. त्यानुसार सर्व त्रुटी दूर करुन बस दिल्या जाणार आहेत. त्यानुसार आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टप्याटप्याने आता बस ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.