कल्याण : कल्याण पश्चिमेतील घास बाजार अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील शफिक खाटी मिठी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत आजी-नातीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
खाटी मिठी इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला मगंळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. भीषण आगीत सदनिकेचे पूर्णपणे नुकसान झाले तर घरात झोपलेल्या ७० वर्षीय महिला आजी व तिची २२ वर्षीय नात आगीत गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला. खातीजा हसम माहिमकर (७०) इब्रा रौफ शेख (२२) अशी मयत महिलांची नावे आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले मात्र या आगीत सदनिकेचे संपूर्णपणे नुकसान झाले. किचनपर्यंत पोहचलेल्या आगीचे स्वरुप पाहता शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरी यांनी व्यक्त केला.